पाटस येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा
हिंदू - मुस्लिम ऐक्याचे दर्शन, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी रक्तदान शिबीर
पाटस (BS24NEWS – सचिन आव्हाड) दौंड तालुक्यातील पाटस येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पाटस तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी हजेरी लावली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास आकर्षक विदुयत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी मोरया ढोल ताशा पथकाने आपली प्रात्यक्षिके सादर केली. पाटस पंचक्रोशी आणि शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने या शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .
पाटस येथे शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी ही दौलत महाराष्ट्राची हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकनृत्य , पोवाडा, धनगरी गीते, कोळीगीते अशा विविध प्रकारच्या लोककला सादर करण्यात आल्या .
शिवजयंती दिनी सकाळी कुरकुंभ येथील फिरंगाई माता मंदिरातुन ज्योत पाटस येथे आणण्यात आली. ज्योत पाटस येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर पाळणा घेण्यात आला
शिवजयंतीनिमित्त दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल तसेच दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, पाटस गावच्या सरपंच अवंतिका शितोळे, उपसरपंच छगन म्हस्के, पाटसचे ग्रामपंचायत सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिवजयंती निमित्त श्री शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन :पाटस येथील शिवजयंती उत्सवात हिंदू मुस्लीम ऐक्य दिसून आले. शिवजयंती निमित्त आलेल्या सर्व शिवभक्तांना पाटस येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सरबताचे वाटप करण्यात आले.