पाणीपुरवठा योजनेचे साहित्य चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक, अंधाराचा फायदा घेत चार जण झाले पसार
चोरीचे साहित्य आणि छोटा टेम्पोसह ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
दौंड (BS24NEWS) दौंड तालुक्यातील कुसेगाव गावच्या हद्दीत दंडवाडी (ता . बारामती ) च्या पाणी पुरवठा योजनेचे लोखंडी वाय आकाराचे सॉकेट व इतर साहित्य चोरी करून एका छोट्या टेम्पोत भरून घेऊन जाणाऱ्या सहा जणापैकी दोन जणांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी पकडले आहे . इतर चार जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले आहेत . याबाबत दंडवाडी च्या सरपंच मनीषा हनुमंत चांदगुडे यांनी पाटस पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस येथील लोखंडीपूल ते दंडवाडी अशी शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी दहा इंची लोखंडी पाईप लाईन आहे सध्या ती पाईपलाईन बंद अवस्थेत आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सदर लोखंडी बंद पडलेल्या पाईप लाईन मधील वाय आकाराचे सॉकेट, रिटन वॉल चोरून कुसेगाव येथील पोईच्या घाटाजवळ सहा इसम त्यांच्या छोट्या टेंपो मध्ये टाकून जात असताना कुसेगाव येथील स्थानिक नागरिकांनी त्यातील दोन जणांना जागीच पकडले . व बाकीचे चार जण पळून गेले . याबाबत पाटस पोलिसांना माहिती मिळताच पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुद्देमालासह दोन चोरांना पकडले .
सहा जणांपैकी सचिन चव्हाण (रा – कुसेगाव ) मोसीम रफिकभाई तांबोळी (रा – पाटस , तालुका – दौंड) हे टेम्पो नंबर (एम एच ४२ ऐक्यू ३८७०) मध्ये टाकून चोरी करत असताना मिळून आले. तसेच त्यांचे चार साथीदार पिंटू संभाजी शितोळे ,शुभम लक्ष्मण खंडाळे ,अमोल बाळू चव्हाण, अक्षय ज्ञानदेव चव्हाण (सर्वजण राहणार कुसेगाव) हे पळून गेले आहेत.
अटक केलेल्या आरोपींकडून एक लोखंडी वाय आकाराचे सॉकेट, रिटन वॉल असा 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच चार लाख रुपये किमतीचा एक बदामी रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा छोटा टेम्पो असा एकुण 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदर चोरी प्रकरणी सहा जणांवर पाटस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सागर चव्हाण हे करीत आहेत.