कोरोनानंतर पिंपळगावच्या यात्रेवर निवडणुकीचे सावट ?
सोसायटीच्या मतदानाची तारीख बदलण्याची ग्रामस्थांची मागणी....
राहू (BS24NEWS)
दौंड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून मोठ्या प्रमाणात निवडणुका शांततेच्या मार्गाने पार पडल्या आहेत. परंतु पिंपळगाव येथील यात्रेच्या दिवशी मतदान व मतमोजणी असल्यामुळे यात्रेवर निवडणुकीचे सावट आले असून निवडणुकीची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे सलग दोन वर्ष पिंपळगाव गावची यात्रा होऊ शकली नाही.श्री सिद्धेश्वर हे पिंपळगावचे ग्रामदैवत असून यात्रा दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी भरवली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी अभिषेकासह पारंपारिक सोंगाचा कार्यक्रम पार पडतो. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा व करमणुकीसाठी तमाशा ठेवला जातो.
दोन वर्षे यात्रा न झाल्यामुळे यंदा यात्रा चांगली होईल अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांना आहे. दि. 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दि. 3 एप्रिल रोजी सोसायटीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असुन त्याच दिवशी मतमोजणी देखील संध्याकाळी होणार असल्यामुळे वादविवादाची शक्यता निर्माण होत असल्याने निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलण्यात यावी अशा प्रकारची मागणी पिंपळगाव ग्रामपंचायत, सोसायटी,यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपळगाव सोसायटीची निवडणूक ही प्रामुख्याने कुल व थोरात यांच्या कार्यकर्त्यांच्या गटात समोरासमोर लढत होणार आहे. सोसायटीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटाकडून सध्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत.
पिंपळगावच्या सरपंच मंगल थोरात म्हणाल्या की , गेल्या दोन वर्षापासून यात्रा न झाल्यामुळे यंदा यात्रेचा उत्साह ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे. सोसायटीचे मतदान यात्रेच्या दुसऱ्या दिवशी असल्यामुळे वाद-विवाद होऊ शकतो. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी आम्ही सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे.
याबाबत दौंडचे सहाय्यक निबंधक हर्षित तावरे म्हणाले की , पिंपळगावकरांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदन हे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पाठवण्यात आले असून त्यांच्याकडून जो निर्णय येईल त्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल.