दौंड(BS24NEWS)
दौंड शहरातील तीन युवक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मेरगळवाडी येथील तलावात युवकांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली असल्याची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
असरार अब्दुल अलीम काझी ( वय २१ ), करिम अब्दुल हादी काझी ( वय २० ), अतिक उझजमा फरिद शेख ( वय २०, सर्व रा. नवगिरे वस्ती, ता. दौंड ) अशी मयत युवकांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि. ६) सायंकाळी ४ वाजता असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी , अतिक उझजमा फरिद शेख हे तिघे घरातुन बाहेर फिरण्यासाठी निघुन गेले होते. रात्री आठ वाजले तरी ते घरी आले नाहित म्हणून घराच्यांनी
असरार अब्दुल अलीम काझी व करीम अब्दुल हादी काझी यांच्या मोबाईल वरती फोन लावला असता फोन बंद होता. मग त्यांच्या सोबत गेलेला मित्र
अतिक उझजमा फरिद शेख याच्या मोबाईल वर फोन लावला असता फक्त रिंग वाजत होती मात्र तो उचलत नव्हता.यामुळे अब्दुल अलीम काझी, असिम इस्माईल शेख , रफिक इकबाल सय्यद, कलिम सलीम सय्यद या सर्वजणांनी त्यांचा दौंड शहरास परिसरात शोध सुरू केला. शहारालागत असणाऱ्या मेरगळवाडी, लिंगाळी (ता. दौंड) येथील शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाजवळ जावून पाहिले असता तेथे या तिघांनी नेलेली हिरो होण्डा कंपनीची स्प्लेंण्डर गाडी मिळून आली. त्यानंतर तलावाच्या नजीक जावून शोध घेतला असता तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे व बॅग असे साहित्य मिळून आले. त्यानंतर शोध घेणाऱ्यांना लोकांना संशय आला की, तिघे मुले तलावात पोहत असताना पाण्यात बुडले असावे असा संशय येताच त्यांनी याबाबत दौंड पोलिस स्टेशनला माहिती दिली.
दौंड पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार भाकरे पांडुरंग थोरात, विशाल जावळे आदींनी घटनस्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तलावातील पाण्यात जावून शोध घेतला असता या तिघेही आढळून आले. त्यांना दौंड उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता अशी माहिती पोलीसांनी दिली.