दौंड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा तलावास कुंपण करा – नंदु पवार
दौंड(BS24NEWS)
दौंड येथे शहरालगत असलेल्या पाणी पुरवठा साठवण तलावात दि.०६ मार्चला शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणा-या ३ युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या साठवण तलावास नगरपालिकेने कोणत्याही सुरक्षित उपाययोजना आजपर्यंत केलेल्या नाहीत यामुळे साठवण तलावामध्ये गेल्या २० वर्षात २५ ते ३० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या साठवण तलावालगत वन विभागाचे क्षेत्र आहे याठिकाणी शहरातील तसेच परीसरातील ग्रामीण भागातील नागरीक सुट्टीच्या दिवशी फोटोशुटसाठी गर्दी करतात. परंतु तलावाच्या ठिकाणी नगरपालिकेकडून नागरीकांना पाण्यात पोहण्यास निर्बंध व धोक्याचे सुचना फलक नसल्यामुळे युवक या पाण्यात पोहण्यासाठी जातात. पाण्याचा अंदाज नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
त्यामुळे पुढीलकाळात खबरदारीचा उपाय म्हणून दौंड नगरपालिकेकडून या तलावास प्राधान्याने तारेचे कुंपण
करावे अशी मागणी दौंड शहर विकास आघाडीच्यावतीने नंदु पवार यांनी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी केली आहे.