महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल…..
राहू (BS24NEWS)
दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा महावितरण च्या वतीने खंडीत करण्यात आला असून याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्यावतीने पिंपळगाव (ता. दौंड) येथील महावितरण कार्यालयासमोर छावणी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दाद न दिल्यामुळे दिवसभर शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या दिला असून आता चूल पेटवून शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय केली आहे.
शेतकरी संघटनेच्या वतीने सातत्याने महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून वीज पुरवठा खंडित करु नये अशी मागणी केली होती. मात्र वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे.
महावितरण कंपनी शेतकऱ्यांशी क्रूरपणे वागत असून
पंढरपुर येथील सुरज रामा जाधव या शेतकऱ्याने विज प्रश्नावर आत्महत्या केली. तरीदेखील महावितरण कंपनीला शेतकऱ्यांची काहीही घेणे देणे नाही असा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
दुपारी एकच्या दरम्यान पिंपळगावच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. पिंपळगावचे शाखा अभियंता पप्पू पिसाळ हे सकाळपासून या कार्यालयात दार बंद करून बसले आहेत. मात्र अद्याप देखील त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले आहेत.
शेतकरी संघटनेच्या क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, दीपक पवार,सुनील नातू,शुभम देवकर, राम गाडेकर, राहुल खळदे, आदीसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.