किसान मोर्चाच्या अध्यक्षांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन
वीजबिल प्रश्नी भाजपा किसान मोर्चा आक्रमक
दौंड (BS24NEWS) दौंड तालुका भाजपा किसान मोर्चाच्यावतीने सोमवार (दि.१४)रोजी आमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे. या उपोषणाच्या अगोदरच भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करीत शेतकरी बांधवांनी एकत्र येण्याचे आव्हान केले आहे.
ही पोस्ट पुढीलप्रमाणे– “अगोदरच दुष्काळ,अतिवृष्टी व कोरोना लॉकडाऊन मुळे आपण सर्वजण पिचलेलो असताना आता कुठं शेतमालाला चांगला बाजार मिळू लागला होता आणि आपण आपल्या उभ्या हिरव्यागार पिकाकड पाहत मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कोणाच्या घरी लग्नाचा खर्च तर काहींच्या घरी पावसाळ्या अगोदर नवीन घराचं स्वप्न पाहत होतो. पण वीज महामंडळाच्या चुकीच्या धोरणांमुळे व पठाणी वसुली मुळे आज विजजोड बंद असल्यामुळे लहान लेकरासारखं प्रेम केलेलं उभ पीक जळून चाललंय. एका दाण्याचं हजार दाण करणारी औलाद आपली, पिकाचं वाढण, जगणं आणि बाजारभाव माहिती नसताना सर्वस्व झोकून शेती करणारे आपण शेतकरी, मग आपल्या सोबत दरवेळी ऐन उन्हाळ्यातचं का अन्याय? चक्रवाढ दराने वीज आकारणी केल्यामुळेच ही वेळ आपल्यावर या वीज महामंडळाने आणली आहे. सर्व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहून व मी सुद्धा जातीचा शेतकरी असल्यामुळे उद्या सोमवारी मी देऊळगाव राजे येथे आमरण उपोषण करत आहे. शेतकरी हीच जात आणी शेती हाच पक्ष समजून सर्वांनी उद्या देऊळगाव राजे येथे सकाळी 10:00 वाजता उपस्थित रहावे. उद्याच्या आंदोलनासाठी मी निमित्त असून हे आंदोलन सर्व शेतकरी बांधवांचे व्हावे व वीज महामंडळाला धडा शिकवाला जावा हिच इच्छा. नैसर्गिक संकटावर मात करणारे आपण एकीच्या बळावर कृत्रिम संकटावर नक्की मात करु हा विश्वास आहे 🙏🙏
धन्यवाद…
आपलाच,
श्री. अभिमान्यू अर्जुन गिरमकर ”
अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत असून गिरमकर यांच्या या आवाहनाला किती शेतकरी प्रतिसाद देतात हे पाहावे लागणार आहे.