दौंडमध्ये महावितरण विरोधात आमरण उपोषण सुरू
ग्रामपंचायतींनी दिली पाठिंब्याची पत्रे
देउळगाव राजे (BS24NEWS)
मागील अनेक दिवसांपासून महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे देऊळगावराजे(ता. दौंड)येथे सोमवार (दि.१४) पासून महावितरण कंपनीच्या विरोधात दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यु गिरमकर व हिंगणीबिर्डी येथील युवा शेतकरी ओंकार तापकिर हे उपोषणाला बसले आहेत.
शेती पंपाची सक्तिची विज बिल वसूली थांबवुन शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, खंडित वीज पुरवठा त्वरित पुर्ववत करावा या प्रमुख मागण्याकरीता हे उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाच्या सुरुवातीस देउळगाव राजेचे ग्रामदैवत भैरवनाथ यांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करण्यात आली. यावेळी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाप्पू भागवत , केशव काळे, दत्तात्रय खळदकर,लक्ष्मण रांधवन,तुकाराम आवचर, राजेंद्र बुराडे,जगन्नाथ बुराडे, नंदकिशोर पाचपुते आदि उपस्थित होते. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पाठिंब्याची पत्र यावेळी उपोषणकर्त्याना दिली. या उपोषणास पाठिंबा मिळत असल्याने आता यातून महावितरण काय तोडगा काढणार? हे पुढील काळात पाहावे लागणार आहे.