जुगार प्रकरणी माजी उपनगराध्यक्षासह इतरांवर गुन्हे दाखल
पुणे ग्रामीण विशेष पथकाची कारवाई
दौंड (BS24NEWS) दि.
दौंड येथे मटका अड्डयावर छापा टाकून ४ जणांकडून सुमारे ५० हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण विशेष पथकाने हि कारवाई केली.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मिळालेल्या बातमीवरून विशेष पथकाने दौंड येथे कल्याण मटका जुगार अड्डयावर कारवाई करून ४ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून सुमारे ५० हजाराचा माल जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
याबाबात पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना दौंड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील नेने चाळ येथे एका दुकानात राजेश उर्फ बंटी जाधव व रमेश जाधव हे दोघे आपले हस्तकांकरवी कल्याण व तारा मटका नावाचा जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी प्रोबेशनरी आय.पी.एस. अधिकारी तेगबिरसिंग संधू व सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना माहिती काढून पथकामार्फत कडक कारवाई करणेबाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार दि. २६ मार्च रोजी प्रोबेशनरी आय.पी.एस. तेगबिरसिंग संधू , सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड व श्रीधर जगदाळे यांचे पथकाने दौंड शहरात मटका अड्डा चालत असलेल्या ठिकाणी साध्या वेशात जावून टेहळणी करून माहिती काढून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला असता तेथे रमेश शामराव जाधव (वय ५० वर्षे ,रा.दौंड, गोवा गल्ली ता.दौंड जि.पुणे ) , अजय नागनाथ जाधव (वय ४९ वर्षे रा.दौंड, आंबेडकर चौक ता.दौंड जि.पुणे ), आयु मौलाबक्ष शेख (वय ५२ वर्षे रा.दौंड, खाटी गल्ली ता.दौंड जि.पुणे ), सौदागर सिदाराम नरगमकर (वय ६० वर्षे रा . दौंड, शालिमार चौक ता. दौंड जि.पुणे )असे पावती पुस्तकावर आकडेमोड करून स्लिपा देवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळवित व खेळत असताना त्यांचे कब्जात रोख रक्कम २५हजार ६२० रूपये तसेच मटका जुगार स्लीप बुके व इतर साहित्य असा एकूण रुपये ५०हजार ८५० रुपयाचा माल बाळगलेले मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता रमेश शामराव जाधव व त्याचा भाऊ राजेश उर्फ बंटी शामराव जाधव रा.दौंड हे दोघे मटका अड्डा चालवित असल्याचे व महेश प्रभाकर जोगळेकर (रा.दौंड )यांनी दुकानाची जागा त्यांना मटका अड्डा चालविण्यासाठी दिली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे या सर्वांचे विरूद्ध दौंड पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे.
मटका अड्डयावर मिळून आलेले ४ आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून मटका अड्डा चालविण्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहेत काय? तसेच मटका अड्डयाचा पुढील कोण सुत्रधार आहे? याबाबतचा अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे करीत आहेत.
निष्पन आरोपी राजेश उर्फ बंटी जाधव हा दौंड नगरपालिकेचा माजी उपनगराध्यक्ष असून त्याचेवर यापूर्वी गर्दीमारामारी , जुगार व सावकारी कायदा असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. तसेच अटक आरोपी रमेश जाधव याच्यावर यापूर्वी जुगार कायदयान्वये एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी आय.पी.एस. तेगबिरसिंग संधू , सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड व श्रीधर जगदाळे यांनी केलेली आहे.