दौंड तालुक्यातील राहू येथे कावडीचा थरार ,मुळा-मुठेच्या पाण्याने शंभू महादेवाला जलाभिषेक…
राहु (BS24NEWS)
पारंपरिक वाद्याच्या गजरात, हर हर महादेवाच्या जयघोषात दौंड तालुक्यातील राहू व पिंपळगाव च्या यात्रेस सुरुवात झाली असून मानाच्या कावडीनी शंभू महादेव व सिद्धेश्वरास जलाभिषेक घालण्यात आला. कावडिचा थरार पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी दोन्ही गावच्या यात्रेची सुरुवात होते. पहाटे देवाला अभिषेक घातला जातो. त्यानंतर मुळा मुठा नदीतील पाण्याने मानाच्या कावडी भरून शंभू महादेवाला जलाभिषेक घातला जातो. मानाच्या कावडी नदीच्या पाण्यात भरल्यानंतर अवघड असा कडा सर करताना शेकडो तरुणांची दमछाक होते.शंभो महादेवाच्या मानाच्या कावडीसह इतर सहा कावडीची पारंपारीक सवाद्य मिरवणुक काढण्यात येते.
आमदार राहुल कुल यांच्या सह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील हजारो भाविकांनी कावडींचा हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
रात्री पारंपारिक अशा सोंगाचा कार्यक्रम बलुतेदार मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कुस्त्यांचा आखाडा होऊन यात्रेची सांगता होते.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाविषाणुच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यंदा शासनाने सर्व निर्बंध उठवल्यामुळे यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.