अज्ञात वाहनाच्या धडकेने राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाचा मृत्यू
दौंड(BS24NEWS)
दौंड- कुरकुंभ रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील राज्य राखीव दलाच्या जवानाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २१ एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान विवेक भोसले आपल्या दुचाकीवरून येथील गोल राऊंड चौकातून बोरावके नगरच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली यामध्ये भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.
राज्य राखीव पोलीस दल परिसरातील गोल राऊंड चौक ते बोरावके नगर हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनत चालला आहे. या रस्त्यालगत राज्य राखीव पोलीस वसाहत असून या परिसरामध्ये सेवा रस्ता बनविला नसल्याने वारंवार अपघात होऊन जवानांचे बळी जात आहेत. पोलीस वसाहतीसाठी सेवा रस्ता नसल्याने दैनंदिन कामासाठी किंवा कामावर रुजू होण्याकरिता पोलीस जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना या मुख्य रस्त्याचाच वापर करावा लागत आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणारे प्रत्येक वाहन भरधाव वेगातच जात असल्याने या परिसरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गोल राऊंड ते बोरावके नगर मार्गावर सेवा रस्ता बनविण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.