पीएमआरडीएमुळे वाढणाऱ्या निवासी क्षेत्रासाठी मुळशीच्या पाण्याचे नियोजन करा — आ.राहुल कुल
यवत (BS24NEWS)
पीएमआरडीए मुळे वाढणाऱ्या निवासी क्षेत्रासाठी मुळशीच्या पाण्याचे नियोजन करा अशी कळकळीची मागणी शासन दरबारी करीत असून वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात असणारे पाणी वाचवणे आणि ज्यादाचे पाणी आणणे गरजेचे असल्याचे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
कासुर्डी (ता.दौंड) विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्या गटाच्या पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.तर विरोधी थोरात गटाची एकही जागा निवडून न आल्याने त्यांची पुरती दाणादाण उडाली.याच पार्श्वभूमीवर सोसायटी मधील नवनिर्वाचित चेअरमन संतोष रघुनाथ आखाडे , व्हाईस चेअरमन धोंडिबा दगडू ठोंबरे व संचालक मंडळाचा आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक गोपीनाथ भोंडवे , पांडुरंग आखाडे , वाल्मिक आखाडे , दिलीप गायकवाड , गणेश आखाडे , नानासाहेब जगताप , विठ्ठल माने , अशोक गायकवाड , सोपान गायकवाड , दत्तात्रय आखाडे , विशाल राजवडे , उद्धव आखाडे , राजाभाऊ आखाडे , धनंजय कोडीतकर , उत्तम सोनवणे , तानाजी राजवडे , ऋषीकेश राजवडे आदी मान्यवर उपस्थित होते.कासुर्डी ग्रामपंचायत वर थोरात गटाची सत्ता असताना देखील कुल गटाने सोसायटी निवडणुकीत एकी दाखवत एकहाती विजय खेचून आणला आहे.दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील महत्वाची ग्रामपंचायत म्हणून कासुर्डी गावाची ओळख आहे.तर विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत या गावातून आमदार राहुल कुल यांना महत्वपूर्ण आघाडी मिळाल्याने कुल यांच्या दृष्टीने गावातील वर्चस्व राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जाते.
आमदार राहुल कुल यांनी यावेळी बोलताना , कासुर्डी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी थोडे इकडे तिकडे झाले नसते तर तेथेही विजय मिळाला असता. दौंड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना राज्यातून निधी कमी मिळाला असला तरी केंद्रीय निधी मधील रस्ते निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. भूमिहीन नागरिकांची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची जबाबदारी माझी आहे . सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात लहान सहान कामे करताना त्रास होतो याकडे कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देऊन त्यांची कामे करून द्यावीत.
सहजपुर , खामगाव आणि यवत याठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाचे साठी प्रयत्नशील असून लवकरच दौंडचे पश्चिम पट्ट्यातील हे महत्वाचे काम मार्गी लागणार आहे. शेती हाच आपल्या तालुक्यातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे.आणि शेतीसाठी पाणी गरजेचे आहे.पाण्यासाठी आपण विशेष प्रयत्नशील आहे.कालव्याची कामे मार्गी लागतील , बेबी कालव्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना झालाय लवकरच स्वच्छ पाणी देखील येईल. शेतीच्या पाण्यावरील शहराचे अतिक्रमण न्यायाने हटेल आणि लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल असेही यावेळी राहुल कुल यांनी सांगितले.
यावेळी गणेश आखाडे , अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उत्तम सोनवणे यांनी मानले.