पुणे जिल्हा परिषदेत जागतिक परिचारिका दिन साजरा
पुणे (BS24NEWS)
पुणे जिल्हा परिषद येथे पुणे जिल्ह्यातील परिचारिका व आरोग्य सेवेत काम करणाऱ्या पदाधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषदेत परिचारिका दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सभागृह येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात केला.
नर्सिंग अधिष्ठात्री “लेडी विथ लॅम्प “फ्लोरेंस नाईटिंगेल यांनी निस्वार्थीपणे केलेल्या रुग्णसेवेच्या कार्यामुळे त्यांच्या जन्म दिवासनिमित्त 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे व जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांच्या हस्ते नर्सिंग अधिष्ठात्री “लेडी विथ लॅम्प “फ्लोरेंस नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलंन करण्यात आले.
महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना अध्यक्षा वैशाली दुर्गाडे यांनी फ्लोरेंस नाईटिंगेल यांचा जीवनपट थोडक्यात सांगितला तर संघटनेच्या सचिव मिनाक्षी शिंदे –मुदगल यांनी जिल्ह्यातील सर्व नर्सेसना व्यवसायाची प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद आरोग्य विभाग , सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी ,तालुका आरोग्य कार्यालयाचे प्रतिनिधि , जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना पदाधिकारी , महाराष्ट्र राज्य नवनिर्मित संघटना पदाधिकारी हजर होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना शाखा पुणे च्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी केले होते .