दौंड शहरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून 31 लाखाचा माल लंपास , नागरिकांत खळबळ
दौंड(BS24NEWS)
दौंड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक परिसरातील व पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर व दौंड पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात चोरी झाली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छोट्या खिडकीचे गज वाकवुन दुकानात प्रवेश करीत तब्बल 31 लाख 15 रुपये किमतीचे मोबाईल व घड्याळे तसेच रोख रक्कम 10 हजार रुपये चोरून नेले असल्याची दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी दिली आहे .
दि.18 मे सकाळी 9.30 वाजण्याच्या दरम्यान दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी दुकान उघडले असता. दुकानातील फरशीवर मोबाईल संचाचे मोकळे बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने दुकानात चोरी झाली असल्याचे उघडकीस आले. या घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची सखोल माहिती घेतली आहे.
दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता साधारणतः रात्री 1वाजून 58मिनिटांनी चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून 4वाजून 10मिनिटांनी ते दुकानातून चोरी करून गेल्याचे दिसत आहे.
ठसे तज्ञ पथकाने घटनास्थळी भेट देवून ठसे घेतले आहेत.
दरम्यान नेहमीच वर्दळ असलेल्या परिसरातील, मुख्य बाजारपेठेतीलच पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी
कार्यालयाच्या मागील बाजूस चोरी झाल्याने चोरट्यांनी दौंड पोलिसांच्या बुडालाच चोरी करून पोलीसांना आव्हान निर्माण केले असल्याची चर्चा शहरात सुरू होती.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत , पोलिस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले की , चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने तपासासाठी दौंड पोलिसांची चार पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक ही तपासासाठी रवाना झाले आहे अशी माहिती दिली.