जय मल्हार व्याख्यानमालेचे देलवडीत आयोजन
केडगाव (BS24NEWS)
देलवडी (ता. दौंड) येथे शनिवार (दि. २८ )पासून जय मल्हार व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती देलवडी ग्रामस्थ व जय मल्हार सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या व्याख्यानमालेत शनिवार (दि. २८) रोजी सायंकाळी ६.३० वाजता आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे आमचा गाव आमचा विकास या विषयावर व्याख्यान होईल. जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांच्या हस्ते व सरपंच निलम काटे यांच्या अध्यक्षतेखाली जय मल्हार सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाचे व व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके, माजी पंचायत समिती सदस्य सयाजी ताकवणे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, बाजार समिती संचालक शिवाजी वाघोले, सोसायटीचे चेअरमन अनिल शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रविवार (दि. २९) रोजी शिव व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते मल्हार नगरीचे सुपुत्र पुस्तकाचे प्रकाशन व वेबसाइटचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, शिवसेना जिल्हापमुख महेश पासलकर, भाजपा तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे,भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, उपसरपंच बाळासाहेब जाधव उपस्थित राहणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आईचं बन या ठिकाणी वृक्षारोपण होणार आहे.