आरोग्यपुणे जिल्हा ग्रामीण

जिल्ह्यातील १०२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार

पुणे(BS24NEWS) जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद स्वनिधी यांच्या जोडीला खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) सुमारे २६ कोटी ७४ लाख रुपयांच्या आवश्यक साहित्य व साधनसामुग्रीची खरेदी करण्यात आली असून त्यातून १०२ केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे. या साहित्य व साधनसामुग्रीचे विधानभवन येथे शुक्रवारी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याची उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणी करणार आहेत.

निवडणूक ब्रेकिंग – अशी असेल दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण रचना

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. प्रसाद यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असणाऱ्या साहित्य व साधनसामुग्रीचे ‘कमतरता विश्लेषण’ (गॅप ऍनॅलिसिस) करण्यात आले. त्यानुसार आवश्यक बाबी सीएसआर निधी, जिल्हा नियोजन समिती निधी तसेच जिल्हा परिषद स्वनिधी या निधी स्रोतातून खरेदी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी ९ खासगी कंपन्यांनी १७ कोटी ६० लक्ष रुपयांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी दिला असून त्यातून एकूण १०२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण शक्य झाले आहे. त्यासाठी २५२ प्रकारची एकूण १२ हजार ७२१ उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद स्वनिधीतून ४ कोटी २५ लाख रुपये देण्यात आले असून त्यातून ५४ आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे. यासाठी २६ प्रकारची १८ हजार ९३४ उपकरणे खरेदी करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्रे झाली आदर्श केंद्रे – विविध निधी स्रोतातून प्राप्त उपकरणातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आदर्श केंद्रे बनले आहे. त्यामध्ये आदर्श बाह्यरुग्ण विभाग, प्रसुतीगृह, प्रयोगशाळा, लसीकरण कक्ष, शस्त्रक्रियागृह, विविध वार्ड सर्व आदर्श करण्यात आले आहेत.

जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने एनक्यूएएस/कायाकल्पनुसार प्रसुतीगृह, शस्त्रक्रियागृहे, छतगळती व इतर आवश्यक दुरूस्तीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘गॅप ऍनॅलिसिस’ करण्यात आले. त्यानुसार समितीकडून ४ कोटी ८९ लाख रुपये प्राप्त झाले असून त्यातून ४८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राना आरोग्य सुविधा उपकरणे व सोयी उपलब्ध झाल्याने केंद्रास्तरावरच २८ प्रकारच्या मोफत वैद्यकिय सेवा व आरोग्य सुविधा प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. आकस्मिक प्रसंगी पहिल्या अर्ध्या तासाच्या आत (गोल्डन अवर) प्राथमिक निदान व उपचार करता येणार असून रुग्ण वेळेत संदर्भित करुन प्राण वाचविण्यास मदत होईल.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रयोगशाळेमध्ये १६ प्रकारच्या तपासण्याऐवजी ३२ प्रकारच्या तपासण्या मोफत करता येतील. टेलिकन्सल्टेशन सुविधेद्वारे विशेषज्ञ सुविधा व उपचार (एक्स्पर्ट ओपिनियन) देणे शक्य होणार आहे. रक्तदाब, मधुमेह, यकृत, किडनी विकार, गरोदर माता व बालकांचे आजार आदींचे निदान व उपचार करणे शक्य होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर विविध मोफत तपासणी व उपचार झाल्याने रुग्णांचा वेळ व आर्थिक बचत होणार आहे असेही डॉ. पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!