दौंड (BS24NEWS) यूपीएससी परीक्षेत दौंड तालुक्यातील पडवी गावच्या सोहम मांढरेने घवघवीत यश मिळवलं आहे. यूपीएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत दौंड तालुक्यातील पडवी गावच्या सोहम मांढरेने यश संपादन केले असल्याने दौंड तालुक्याची मान उंचावली आहे.
आपल्या मुलाने मिळविलेल्या यशासमोर सोहम पांढरे च्या आई-वडिलांना आभाळ ठेंगणं वाटू लागलं आहे. गेली ३ वर्ष सोहम मांढरे हा जीवतोड मेहनत करत होता. अखेर आपल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान निकालानंतर सोहम मांढरे ने बोलून दाखवलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरीसेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल आज जाहीर झाला. यामधे महाराष्ट्रातील उमेदवारांचा टक्का वाढला आहे. अनेक सर्वसाधारण घरातील मुलांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं आहे. दौंडच्या सोहम मांढरे यानेही आपल्या आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण केलं. यूपीएससीच्या अंतिम निकालात सोहमने २६७ रँक मिळवत विजयाचा झेंडा रोवला.
‘लहानपणासूनच अधिकारी होण्याची त्याची जिद्द होती त्यादृष्टीने त्याने कायम प्रयत्न केला आणि त्यास आज यश मिळाले असल्याचे ही सोहम मांढरे ने बोलताना सांगितले.
सोहम लहानपणापासूनच शाळेत अगदी हुशार होता. आई शिक्षिका असल्याने अभ्यासाचा संस्कार लहान वयात झाला होता. अगदी प्रत्येक वर्गात सोहमचा प्रथम क्रमांक यायचा. दहावी बारावीतही सोहम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. पुढे इंजिनिअरींगमध्येही सोहमने प्राविण्य मिळवलं. पण इंजिनिअर झाल्यावरही सोहम स्वस्थ बसला नाही. त्याला नागरी सेवेत जायचं होतं. त्यादृष्टीने त्याने तयारी सुरु केली. नागरी सेवेच्या अभ्यासाला सुरुवात करुन काही महिनेच उलटले की कोरोनाचं संकट आलं. पण कोरोनाच्या संकटातही तो डगमगला नाही. त्याने जिद्दीने आणि उमेदीने अभ्यास सुरुच ठेवला. परिश्रम केले की यश मिळतेच, हे त्याला चांगलं माहिती होतं. झालंही तसंच, ३ वर्षातच त्याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.