जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत येथे मुक्कामी दाखल
यवत(BS24NEWS)
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज शनिवार रोजी रात्री 8 वाजनाच्या सुमारास यवत मुक्कामी दाखल झाला . तत्पूर्वी कासुर्डी आणि यवत गावाच्या शिवेवर यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे टाळ मृदुंग च्या गजरात स्वागत केले. यावेळी यवत चे सरपंच समीर दोरगे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम ,माजी उपसरपंच सदानंद दोरगे कुंडलिक खुटवड ,गणेश शेळके ,नाना दोरगे यांनी स्वागत केले.
त्यांनतर यवत (ता.दौंड) येथील काळभैरवनाथ मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची समाज आरती झाल्यानंतर दिंडी प्रमुखांनी हजेरी होऊन वैष्णव मंडळीनी यवत ग्रामस्थांनी केलेल्या स्वादिष्ट पिठलं भाकरीचा आनंद घेतला.
पालखी सोहळ्याने लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून उरळी कांचन गावातील विसावा उरकत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ऊन सावल्याच्या खेळात व वरुण राजाची हजेरीत “तुकाराम नामाचा “जयघोष करत पालखी सोहळ्याने हवेली तालुक्यातुन दौंड तालुक्यात म्हणजेच बोरिभडक गावात प्रवेश केला .यावेळी तुकोबांच्या स्वागतासाठी दौंड तालुक्याच्या वतीने दौंड आणि हवेली तालुक्याच्या सीमेवर स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.
बोरिभडक गावातून पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होत सहजपुर खामगाव आणि कासुर्डी ग्रामस्थांची सेवा घेत यवत गावात दाखल झाला.
तालुक्यातील पहिल्या मुक्काम चे ठिकाण असणारे यवत गावात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी जोरदार पणे करण्यात आल्याचे दिसून येत होते .पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या होत्या तर वारकऱ्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली होती . पालखी मार्गावर भैरवनाथ विद्यालय यांच्या वतीने काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. दोन वर्षे कोरोना च्या महामारी मुळे रद्द करण्यात आलेला पालखी सोहळा आणि तुकाराम महाराज यांचे न घडलेले दर्शन आणि दर्शनाची लागलेली आतुरता यामुळे यावर्षी पालखी सोहळ्यात सहभागी व दर्शनासाठी वैष्णवाची गर्दी लक्षणीय रित्या जाणवत होती .
पालखी सोहळ्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यवत पोलिस यंत्रणेने पालखी मुक्काम तळा शेजारीच मदत कक्ष उभा केला तर इतर ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.