कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीत पुन्हा एकदा केमिकल चोरी
हार्मोनी ऑरगॅनिक्स कंपनीत ४७ लाख २७ हजारांची चोरी
दौंड (BS24NEWS)
कुरकुंभ (ता. दौंड) येथील एमआयडीसीमधील कंपन्यातून केमिकल चोरीचे सत्र सुरूच आहे.
कुरकुंभ एमआयडीसीमधील हर्मोनी ऑरगॅनिक्स प्रा.लि . या कंपनीतून ४७ लाख २७ हजार २५० रूपयांचे केमिकल चोरी झाले आहे असल्याची घटना घडली आहे. कुरकुंभ एमआयडीसीमध्ये मागील चार महिन्यांमधील चोरीची ही चौथी घटना आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
हार्मोनी ऑरगॅनिक्स कंपनीचे स्टोअर्स मॅनेजर दिपक मोतीराम चौधरी (वय ५६, रा. भिगवण रोड इनामदारनगर, पांडूरग प्रेस्टीज फ्लॅट नं ३६, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवार (दि. २६ जून) रात्री ते सोमवार (दि. २७ जून) सकाळ यादरम्यान घडला आहे.
हार्मोनी ऑरगॅनिक्स कंपनीत पॅलेडियम कॅटॅलिस्ट २६ किलो व कॅटॅलिस्ट १०१ नावाचे १७ किलो वजनाचे केमिकल वेगवेगळे सीलबंद डब्यात ठेवले होते. हे केमिकल मागणीप्रमाणे उत्पादन विभागाला पुरवले जाते. त्यामधील १.२०६ किलो ग्रॅम केमिकल पुरवठा विभागाला दिले. उर्वरित २६ किलो केमिकल निळ्या रंगाच्या ड्रममध्ये प्लास्टीक पिशवीत ठेवले होते. दुसऱ्यावेळी पुन्हा हे केमिकल उत्पादन विभागाला लागणार होते. केमिकल ठेवल्या ठिकाणी गेले असता केमिकल दिसून आले नाही. या केमिकलची शोधाशोध करीत असताना कॅटॅलिस्ट केमिकल देखील दिसून आले नाही. त्यामुळे केमिकल चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलिस सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे करीत आहेत.