जिल्हा बँकेवर दरोडा टाकणाऱ्या आरोपीला अटक…आरोपीला 12 जुलै पर्यत पोलीस कोठडी…
राहु(BS24NEWS)
गेल्या सहा वर्षांपूर्वी राहू (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेवर दरोडा टाकून दोन सुरक्षारक्षकांना चाकुचा धाक दाखवत दोरीने बांधून ठेऊन
स्ट्रॉंग रुममधील तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून साडे पासष्ट लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी फरार आरोपीला कन्हेरगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिताफिने जेरबंद केले आहे.
सदरच्या गुन्ह्यात या पूर्वी सहा आरोपी अटकेत असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.या गुन्ह्यातील आरोपी तुकाराम उर्फ तुषार शिवाजी सरडे (वय 33, रा. कनेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) हा अद्याप फरार होता.
दि. 10 सप्टेंबर 2016 मध्यरात्री 2 वाजता तुषार सरडे याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या राहू येथील शाखेवर दरोडा टाकला होता.सुरक्षारक्षकास नायलाॅन दोरीने झाडाला बांधुन ठेवले.बॅकेच्या पाठिमागिल लोखंडी खिडकेचे गज गॅस कटरच्या साह्याने त्यांनी तोडुन बॅकेत प्रवेश केला.तसेच दोन्ही सायरन एकाच वेळी बंद करुन त्यांनी अत्यंत हुशारीने सीसीटीव्ही कॅमेरा दुसरी कडे वळवून, त्याची रेकॉर्डिंग झालेली सीडी देखिल त्यांनी पळवुन नेली होती.बॅकेच्या आतमध्ये असेलेली तिजोरीच्या दरवाज्याचे व तिजोरीचे लाॅक गॅस कटरने तोडुन तिजोरीतील रोख रक्कम 65 लाख 57 हजार 485 रुपये चोरून नेले होते.
याबाबत यवत पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका मार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु होता. दरम्यान हवालदार सचिन घाडगे व अजित भुजबळ यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार तुषार शिवाजी सरडे हा डोके वस्तीवर कन्हेरगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथे येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने कन्हेरगाव डोके वस्ती चौकात सापळा रचून त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, जनार्धन शेळके, अजय घुले, आसिफ शेख, मंगेश थिगळे, सहायक फौजदार मुकेश कदम यांनी केली.