गोहत्या करून मांसविक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, चौघांवर गुन्हा दाखल
दौंड(BS24NEWS)
दौंड शहरातील इदगा मैदान परिसरात गोहत्या करून गोमांस विक्रीसाठी रवाना होत असल्याची खबर बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळताच त्यांनी दौंड पोलिसांच्या मदतीने कत्तलखान्यावर धाड टाकून कारवाई केली. यामध्ये एका आरोपीला रंगे हात पकडण्यात आले असून इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
दौंड पोलिसांनी धंद्याचा मूळ मालक इद्रिस अबिद कुरेशी(रा. कुरेशी गल्ली दौंड) याच्यासह किरण पांडुरंग कुंभार(रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस जिल्हा सोलापूर), मुश्रीफ कुरेशी, बबलू कुरेशी(रा. बारामती) यांच्या विरोधात गोवंश हत्या( सुरक्षा) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा 1995 , भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड मध्ये ईदगा मैदान परिसरातील कत्तलखान्यात इद्रिस आबिद कुरेशी जनावरांची कत्तल करून त्यांचे गोमांस विक्रीसाठी पाठविणार असल्याची खबर बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ, शहरात रात्रीच्या गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस उपनिरीक्षक सुनिता चवरे व पथकास सोबत घेऊन शहरातील इदगा मैदान परिसरातील या बेकायदेशीर कत्तलखान्यावर धाड टाकली व त्या ठिकाणाहून कत्तल केलेल्या जनावरांचे मांस,७ जिवंत जनावरे व दोन चार चाकी वाहने असा ४ लाख २ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेली जनावरे बोरमलनाथ येथील गोशाळेत पाठविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, पोलिस उपनिरीक्षक सुनिता चवरे, पोलिस कर्मचारी विकास गावडे, पांडुरंग थोरात, महेंद्र लोहार, निखिल जाधव,अमीर शेख, रवींद्र काळे, योगेश गोलांडे, सुरेश चौधरी या पथकाने हिर कारवाई केली.