पुणे जिल्हा ग्रामीण

पक्ष फोडणे, दमदाटी करणे यातच सरकार व्यस्त – खा. सुप्रिया सुळे

दौंड(BS24NEWS)

अतिशय असंवेदनशील असं ईडीचे सरकार असुन पक्ष फोडणे,लोकांना दमदाटी करणे यात ते एवढे व्यस्त आहेत की, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना समजत नाहीत अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना दौंड तहसिल कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टिका केली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, सोहेल खान आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, महिलांच्या बाबतीत बोलताना राज्यातील सर्वच आमदारांनी त्यांचा मानसन्मान राखूनच वक्तव्य करावेत. महिलांचा मानसन्मान राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत बोलताना जे कॉन्ट्रॅक्टर खराब काम करत असतात त्यांना ब्लॅक लिस्ट करावे .राज्यातील सत्ता पाडण्यामध्ये खूप घाई करून त्यानंतर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र अजूनही पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक बसला असल्याची टीका त्यांनी केली.देशात सध्या जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो त्यांच्यावर धाडी पडतात व त्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही त्या म्हणाल्या.

मोहित कंबोज यांनी बारामती ॲग्रो बाबत केलेल्या ट्विट बाबत खासदार सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की , मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहे .मुंबईत काय चालते याची मला कल्पना नाही.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आणि बारामती जिंकण्याच्या उद्देशाने आढाव बैठकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात येणार असल्याबाबत त्यांना विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या की , देशाच्या अर्थमंत्री या बारामतीत येत असतील व मी मतदार संघात असेल तर मी त्यांचे स्वागतच करेल .

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांच्या कामकाजाबाबतच्या तक्रारीबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार सुळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!