पुणे जिल्हा ग्रामीण

दौंड तालुक्यातील महामार्गाच्या समस्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकारात्मक – आमदार राहुल कुल

दौंड(BS24NEWS)

न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांच्या आढावा बैठकी दरम्यान केली आहे

 

यावेळी बैठकीदरम्यान आमदार कुल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील वाहतुकीची कोंडी सुटावी व वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने शेवाळवाडी, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील २१ ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड (ता. दौंड) येथे अतिरिक्त अंडरपास बांधण्यात यावा, केंद्रीय रस्ते निधीद्वारे दौंड तालुक्यातील खोरवडी व बोरीबेल येथे रेल्वे अंडर पाससाठी निधी मंजूर करावा या मागण्या केल्या.

 

या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याचे ही आमदार कुल यांनी सांगितले.

 

या बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, एनएचएआयचे महाराष्ट्र राज्य प्रादेशिक अधिकारी राजीव श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!