ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड ॲपद्वारे महसुली अर्धन्यायिक प्रकरणांच्या निकालाला विक्रमी गती, पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचा नावीन्यपूर्ण उपक्रम
पुणे(BS24NEWS)
अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड अॅप’द्वारे अर्धन्यायिक प्रकरणांबाबत वकील आणि पक्षकारांना माहिती देण्याची प्रणाली विकसीत केली आहे. या अभिनव उपक्रमाचा वकील आणि पक्षकारांना फायदा होत असून प्रकरणे निकाली काढण्याचा कामाला गती मिळाली आहे.
महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढताना जुन्या प्रणालीत वकील आणि पक्षकारांना तारखा लिहून घ्याव्या लागायच्या. प्रशासकीय कामामुळे बोर्ड रद्द झाला किंवा वेळ बदलली तर पक्षकार, वकिलांना पुर्वसूचना देणारी यंत्रणा नव्हती. सुनावणीच्या वेळेस वकील व पक्षकारांची गर्दी होऊन त्यांना सुनावणीसाठी ताटकळत बसावे लागत होते. प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढत होते. या नव्या प्रणालीमुळे सर्वांना सुविधा होणार असून पक्षकार आणि वकिलांना मोबईलच्या माध्यमातून प्रकरणांबाबत अद्ययावत माहिती मिळू शकणार आहे.
*अर्धन्यायिक प्रकरणांची प्रक्रिया सुटसुटीत*
सुनावणी बोर्ड आणि बजावणी बोर्ड अशी विभागणी करून त्याचे दिवस निश्चित केले. बजावणी बोर्डमध्ये नोटीस न बजावलेल्या तसेच कोर्टाची कागदपत्रे न आलेल्या अपरिपक्व प्रकरणांचा समावेश असतो. सुनावणी बोर्डवर फक्त परिपक्व प्रकरणे घेतली जातात. त्यावर तीन ते चार वेळा सुनावणी होऊन निर्णय दिला जातो. त्या केसचा निर्णय दिला जातो. त्यानंतर पक्षकारांना सर्टिफाईड नकला दिल्या जातात, त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे.
तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे सुनावणी असलेल्या वकील व पक्षकारांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे. आठवड्यात तीन दिवस सुनावणी बोर्ड आणि दोन दिवस बजावणी बोर्ड असे पाचही दिवस बोर्ड सुरू रहात असल्याने प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाणे वाढले आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वात वाढ झाली आहे.अधिकाऱ्यांना टच स्क्रीन टॅब लाईव्ह बोर्ड अपडेट करणे एका क्लिकवर शक्य झालू असून जुन्या केसेस निकाली काढण्यासाठी प्रभावी नियंत्रण करणे शक्य झाले आहे. संबंधितांनी प्रकरणांची माहिती जाणून घेण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवर जावून ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.
*विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी*-*पक्षकार आणि वकीलांना केसेसची सद्यस्थिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने सुनावणी व्यतिरिक्त कार्यालयात चौकशीसाठी होणारी गर्दी कमी होते. महसुली न्यायालयाच्या कामात पारदर्शकता आणी गतिमानता आली आहे. केसेस निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यस्तरावर प्रत्येक महसुली न्यायालयात करण्याचे नियोजन आहे.*
*ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड अॅपची वैशिष्ट्ये*
– सुनावणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता प्रकरणांची माहिती (बोर्ड) मोबाईल ॲपवर
– सुनावणीची संभाव्य वेळ पक्षकार आणि वकिलांना आदल्या दिवशी उपलब्ध.
– सुनावणीच्या दिवशी प्रत्यक्ष कामकाजानुसार संभाव्य सुनावणीची वेळ अद्ययावत होते.
– मोबाईल संदेशाद्वारे प्रकरणांची सद्यस्थिती, वादी प्रतिवादी, त्यांचे वकील, सुनावणीची तारीख याची माहिती
– अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, रिसेप्शन परिसर, कॅन्टीनमध्ये स्मार्ट स्क्रीनची सुविधा
– स्मार्ट स्क्रीनवर चालू केसेस, पुढील केसची संभाव्य वेळ याची माहिती नागरिकांना समजेल अशा पद्धतीने कलर कोडींगनुसार
-पुणे जिल्ह्यात सर्व महसुली कोर्टमध्ये अर्थात जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, आठ उपविभागीय अधिकारी, १५ तहसिलदार आणि १०० मंडळ अधिकारी अशा एकूण १२५ कोर्टमध्ये ही प्रणाली कार्यरत.
-प्रकरणांची माहिती ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड मोबाईल ॲप आणि टच स्क्रीन इन्फॉर्मेशन किऑस्कवर उपलब्ध