दौंड तालुक्यातील पुर्व भागात झालेल्या पावसामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी – भाजपा किसान मोर्चाची मागणी
दौंड(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील पुर्व भागात झालेल्या पावसामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी भाजपा किसान मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.
दौंड तालुक्याच्या पुर्वभागामध्ये जवळपास दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. दि.२५ रोजी रात्री ७ वाजता चालू झालेला पाऊस दि.२७ रोजी दुपारी साडेचार वाजता थांबला होता. तालुक्यातील देऊळगावराजे मंडल मध्ये जवळपास १०० मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने देऊळगावराजे, वडगाव दरेकर, पेडगाव, शिरापूर, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, आलेगाव, बोरीबेल या गावांमध्ये टॉमॅटो, कपाशी, ढोबळी मिरची, उसाची नवीन लागण, सोयाबीन, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून हाताशी आलेले पिक पावसामुळे जमीनदोस्त झालेले आहे. त्यामुळे सध्या शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी आपण कृषी सहाय्यक, तलाठी यांना सदरील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीचे पत्र दौंड तालुका भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यु गिरमकर यांनी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांना दिले आहे. या निवेदनावर हरिश्चंद्र ठोंबरे, हेमंत कदम, संतोष पाचपुते, सतीश आवचर, देविदास ढवळे, कपिल माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.