बांधकाम व्यावसायिकाकडून वृद्धाच्या १ कोटी ८० लाखाच्या फसवणूक प्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल
दौंड(BS24NEWS)
एका खाजगी कंपनीतून निवृत्त झालेल्या वृद्धाची दौंड मधील एका बांधकाम व्यावसायिकाने तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली असुन याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी मोजेस डॅनियल यादव (रा. पंचवटी अपार्टमेंट, बंगला साईड दौंड) हे कॅन्सर ग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांना उपचारासाठी मोठ्या पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासह त्यांची आई, भाऊ व बहिणी यांच्या नावे असलेल्या शहरातील वडिलोपार्जित ३५ गुंठे जमिनीचे व्यवहार करण्याचे हक्क (पॉवर ऑफ ऍटर्नि) स्वतःकडे घेतले होते. सर्वांच्या संमतीने ती जमीन गहाण ठेवून किंवा विक्री करून पैसे जमविण्याचा त्यांचा विचार होता.दरम्यान फिर्यादी मोजेस यादव हे पुणे येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना आरोपी श्रीराम उद्धवराव मांढरे (रा. शिवगौरी अपार्टमेंट, दीपमळा, दौंड) यांनी
त्यांची तेथे जाऊन भेट घेतली व तुम्हाला पैशाची गरज आहे, तुमच्या उपचारासाठी मोठा खर्च आहे म्हणून मी तुमची जमीन विकत घेतो. माझ्या बँक खात्यात ४ ते ५ कोटी रुपये शिल्लक आहेत. मी तुम्हाला तुमच्या जमिनीचे बाजारभावाप्रमाणे २ कोटी रुपये देऊ शकतो. मी दौंडचाच आहे, तुमची फसवणूक करणार नाही असे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादी मोजेस यादव हे उपचार घेऊन पुन्हा दौंडला येताच आरोपी मांढरे यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळेस आरोपी मांढरे याच्यासोबत ३-४ इसमही होते. आपल्या सोबतच जमिनीचा व्यवहार करावा म्हणून त्याने मोजेस यादव यांना तयार केले.फिर्यादी यादव यांनी आपल्या घरातील सदस्यांशी चर्चा करून आपली शहरात असणारी ३५ गुंठे जमीन आरोपीस २ कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि. १८ नोव्हेंबर २०१४ रोजी फिर्यादी यांनी आरोपीस जमिनीची खरेदी दिली. त्यावेळी आरोपी मांढरे याने फिर्यादी यादव व त्यांची आई, भाऊ, बहीण यांच्या नावे जमिनीचा मोबदला म्हणून स्वतःच्या बँक खात्याचे २ कोटी रुपयांचे स्वतंत्र धनादेश दिले. या धनादेशापैकी २० लाख ५० हजार रुपयांचे असलेले २ धनादेशच वटून फिर्यादी यांना पैसे मिळाले व इतर सदस्यांना दिलेले १ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांचे ६ धनादेश वटलेच नाहीत. आरोपी मांढरे याने आपल्या बंद खात्याचे धनादेश देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली हे लक्षात आल्याने फिर्यादी यादव यांनी आरोपी मांढरे यास विचारणा केली असता. आरोपी मांढरे याने मला तुमची जमीन नको तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात या असे म्हणत दि.२८एप्रील २०१७रोजी दुय्यम निबंधक कार्यालय दौंड येथे बोलवून आमची फसवणूक करून चुक दुरुस्ती दस्त करून घेतला. व त्यानंतर त्यांनी पुन्हा वेगवेगळे सात लोकांच्या नावाने चेक दीले. ते चेक दिलेल्या बँकेच्या अकाउंट मध्येही पैसै नव्हते अश्या प्रकारे आरोपी मांढरे याने उर्वरित रक्कम १ कोटी ७९लाख ५०हजार हि रक्कम देण्यास टाळटाळ करीत आहे अशी तक्रार फिर्यादी यादव यांनी दिली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन याप्रकरणी दौंड पोलिस पुढील तपास करीत आहेत.