दसऱ्या आधीच सराफी पेढीचे ६२तोळे सोने चोरट्यांनी लुटले ….. दौंड पोलिसांत गुन्हा दाखल
दौंड(BS24NEWS)
दौंड शहरातील सराफ व्यापाऱ्याचे ६२ तोळे सोने लुटून नेले असल्याची घटना घडली आहे. शहरातील शालिमार चौक येथील रत्नत्रय ज्वेलर्स या सराफ पेढीचे ६२ तोळे सोन्याचे दागिने किंमत ३० लाख १८ हजार ६०४ रूपये असलेली बॅग चोरट्याने लंपास केली आहे.रत्नत्रय ज्वेलर्स पेढीचे व्यवस्थापक नंदकिशोर विधाते (रा. दौंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असुन दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.५० ते ५ वाजण्याच्या दरम्यान येथील हॉटेल सिटी इन परिसरात सदरची घटना घडली. फिर्यादी नंदकिशोर विधाते हे आपल्या दुकानाचे ६२ तोळे सोन्याचे बनविलेले दागिने घेऊन पुण्याहून दौंडला आले होते. सराफ पेढीच्या मालकाचे नातलग त्यांच्यासोबत होते म्हणून दौंडला आल्यावर फिर्यादी यांनी आधी नातलगाला येथील फॉरेस्ट ऑफिस परिसरात असणाऱ्या मालकाच्या बंगल्यावर सोडले व दुचाकी वर सोन्याच्या दागिन्यांची असलेली बॅग घेऊन ते रत्नत्रय ज्वेलर्स या आपल्या दुकानाकडे निघाले असता रस्त्यामध्ये चोरट्याने दुचाकी वरील सोन्याच्या दागिन्यांची असलेली बॅग लंपास केली आहे. याप्रकरणी पुढील तपास दौंड पोलिस करीत आहेत.