विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणीना उजाळा…राहूत वीस वर्षांनी भेटले बाल सवंगडी…
राहु (BS24NEWS)
दौंड तालुक्यातील राहू येथील कैलास विद्या मंदिर या शाळेतील सन 2002-03 च्या इयत्ता 10वी च्या माजी विद्यार्थ्यानी शिवशंभो लॉन्स येथे स्नेह मेळावा आयोजित केला होता. तब्बल वीस वर्षांनी भेटल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व चुकीच्या प्रसंगी केलेली शिक्षा यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी झालो असल्याची भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपण त्यांच्या हातावर छडी मारली, त्याच विद्यार्थ्यांच्या हस्ते आपला सन्मान होत असल्याचे पाहून शिक्षक देखील गहिवरून आले. आपले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवत असल्यामुळे शिक्षकांना देखील अभिमान वाटत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
सदर कार्यक्रमास कैलास विद्या मंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक व्ही. के.मुळे, माजी मुख्याध्यापक टी.डी. चव्हाण व हनुमान विद्यालय, देवकरवाडीचे मुख्याध्यापक ए.डी. चव्हाण उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र खेडेकर, पल्लवी शिंदे यांनी केले, प्रास्ताविक दिनेश शिंदे यांनी केले व आभार अभिजीत चव्हाण, रामदास शिंदे यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे संयोजन दिपक शिंदे यांनी केले.