पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून निलंबित करा – दौंड राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

दौंड(BS24NEWS)

महिलांचा सन्मान करणे पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या ठिकाणी जर महिलांचा अपमान होणार असेल तर तो सहन केला जाणार नाही. राज्यातील सर्व आमदारांनी, जर ते महिलांचा सन्मान करीत असतील तर त्यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित करावा. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी अपमानास्पद बोलणे हा विषय कोणत्या पक्षाशी संबंधित राहिलेला नसून तो सामाजिक प्रश्न झालेला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर महिलांचा सन्मान राखावयाचा असेल तर त्यांनी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी जर त्यांची हकालपट्टी केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे खुले आव्हान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी राज्य सरकारला दिले आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. याप्रसंगी वैशाली नागवडे बोलत होत्या.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या या आंदोलनावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासो पवार , शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे ,सोहेल खान ,बादशाह शेख, राजन खट्टी, काँगेसचे हरेश ओझा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

50 खोक्यांच्या या बोक्यांचा जाहीर निषेध, खोक्यातून निघालेल्या या बोक्याचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!