दौंड पोलिसांचा तपास, न्याय वैद्यकीय पुरावा व साक्ष तपासून बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे कारावासाची शिक्षा
जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
दौंड(BS24NEWS)
बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी गणेश संजय कंपलीकर (रा. नटराज कॉलनीच्या मागे, दौंड ता. दौंड) यास बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे .
दि.6 एप्रिल 2014 रोज दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान पीडिता ही इलायची चिंच खाण्याकरीता पडीक नटराज कॉलनी, दौंड येथे गेली असता आरोपी गणेश कंपलीकर तेथे आला आरोपी याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला, अशी फिर्याद पीडितेच्या वडीलांनी दौंड पोलीस स्टेशन येथे केली होती.
हा तपास दौंड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. लोंढे यांनी केला. आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी न्यायालयीन बंदी होता. प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी म्हणजेच पीडितेची वडील यांनी न्यायालयात साक्ष दिली. पीडिता ही 9 वर्षांची असूनही तिने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. खटल्यामध्ये डॉ. आर. आर. पाखरे यांचा न्याय वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी ही महत्वाच्या ठरल्या आहेत.
विशेष सरकारी वकील वसेकर यांनी खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले. त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गणेश संजय कंपलीकर याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 प्रमाणे 20 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कलम 10 प्रमाणे पाच वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड व कलम 12 प्रमाणे तीन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
पीडितेस मनोधैर्य योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा आदेश सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांना केला आहे. खटल्यामध्ये सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांना दौंड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार सहायक फौजदार राजाराम ज्ञानदेव जगताप व न्यायालयीन कोर्ट पैरवी एन. ए. नलवडे यांनी सहकार्य केले.