संयुक्त महाराष्ट्रासाठी व अस्मितेसाठी प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे निंदनीय – विक्रम पवार
दौंड(BS24NEWS)
संयुक्त महाराष्ट्रासाठी व त्याच्या अस्मितेसाठी झटणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रात गुन्हे दाखल करणे हे निंदनीय असल्याचे मत मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार यांनी व्यक्त केले.
मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर मराठा महासंघाच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस
विक्रम पवार म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रासाठी व त्याच्या अस्मितेसाठी झटणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलिसांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनीच गुन्हा दाखल करणे अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादामध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोंम्मई यांनी निरर्थक व बेताल वक्तव्य केले याचा निषेध म्हणून येथील मराठा महासंघाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले. परंतु आंदोलकांनी कर्नाटक राज्याच्या बसवर जय महाराष्ट्र अशा घोषणा लिहून निषेध केल्याने दौंड पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.महाराष्ट्रातील आंदोलनाबाबत, कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना राज्यातील कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे सांगतात आणि येथील प्रशासनही राज्याच्या अस्मितेसाठी लढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करते त्यामुळे समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादाविषयी न्यायालयीन बाब सुरू असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बेताल वक्तव्य करतात, कर्नाटकचे मुख्यमंत्री न्यायालयापेक्षा मोठे झाले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन महाराष्ट्र विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली.