पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत – आमदार राहुल कुल

दौंड(BS24NEWS)

ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवाबससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

याबाबत बोलतान आमदार राहुल कुल म्हणाले की, कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवादेखील सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला होता. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.‌ पीएमपीएमएल प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती‌. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून आम्ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना याबाबत माहिती देत ही सेवा सुरू होणे गरजेचे आहे अशी मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही नागरिकांच्या या समस्येची दखल घेऊन पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना आज (दि.५) रोजी सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचेही आमदार कुल यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!