दौंड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 83.63 टक्के मतदान……
राहू(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. किरकोळ वाद विवाद वगळता तालुक्यातील आठ गावांमध्ये शांततेत मतदान झाले. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी सरासरी 83.63 टक्के मतदान झाले.
तालुक्याच्या पश्चिम भागातील पाटेठाण, दहिटणे, देवकरवाडी, नांदूर,बोरीभडक, डाळिंब सह दापोडी व लोणारवाडी आदी ग्रामपंचायत साठी मतदान झाले. या गावांमध्ये काही ठिकाणी कुल समर्थक व थोरात समर्थक आमने सामने होते तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्या करून गाव कारभारी निवडणुकीला सामोरे गेले.
रविवार दि. 18 रोजी सकाळी लवकर मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत नागरिकांच्या लांबच लांब रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्या होत्या. सरासरी दुपारपर्यंत 60 टक्के मतदान झाल्याचे पहावयास मिळाले. दुपारनंतर मात्र मतदान केंद्राबाहेर शांतता होती. चार वाजल्यानंतर पुन्हा मतदारांची गर्दी मतदान केंद्राबाहेर झाली.तालुक्यात एकूण 15504 मतदाना पैकी 6193 पुरुष व 6773 स्त्रियानी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यामध्ये सरासरी 83.63 टक्के मतदान झाले.
पाटेठाण येथे 86.53 टक्के, दहिटणे येथे 82.29 टक्के ,देवकरवाडी येथे 89.53 टक्के,नांदूर येथे 86.75 टक्के,बोरीभडक येथे 83.57 टक्के ,डाळिंब येथे 81.09 टक्के , दापोडी येथे 79.98 टक्के ,लोणारवाडी येथे 85.53 टक्के मतदान झाले.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या वतीने सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.