देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला आज खूप आनंद होतो आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मराठीतून भाषण सुरु करून जिंकली उपस्थितांची मनं
मुंबई (BS24NEWS) : देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला खूप आनंद होतो आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी आणि मुंबईसाठी खूप मोठा आहे. आज पहिल्यांदाच दोन वंदे भारत ट्रेन्स एकत्र सुरू झाल्या आहेत. मुंबई आणि पुणे या दोन आर्थिक केंद्रांना धर्माच्या केंद्रांशी जोडणार आहेत.
महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रा यांना प्रोत्साहन देणाऱ्या ट्रेन आहेत. शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन, नाशिक, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भेट देणं वंदे भारतमुळे सुकर आणि सुखकर होणार आहे. सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारतमुळे आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरपूर या ठिकाणी जाणं सोपं होणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी आज शुभेच्छा देतो. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारताच्या वेगाची खूण आहे. भारताची प्रगती आणि वेग या दोन्हींचं प्रतिबिंब म्हणून वंदे भारतकडे पाहिलं पाहिजे.
आत्तापर्यंत देशात १० वंदे भारत ट्रेन्स सुरू झाल्या आहेत. देशातल्या १७ राज्यातल्या १०८ जिल्ह्यांना जोडण्याचं काम वंदे भारत एक्स्प्रेसने केलं आहे. एक काळ होता की खासदार चिठ्ठी लिहायचे आणि सांगायचे की आमच्या स्टेशनवर एक्स्प्रेस ट्रेनला दोन मिनिटं थांबा हवा. आज देशभरातले खासदार भेटतात तेव्हा वंदे भारत ट्रेनची मागणी करतात असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या लोकांना ही ट्रेन हवी होती त्यामुळेच आम्ही एकदा दिवसात दोन ट्रेन्स सुरू केल्या आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इथे जमलेले सगळेच लोक या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की मला हा विश्वास आहे की डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढेल. महाराष्ट्रात रोजगाराच्या संधीही लवकरच उपलब्ध होणार आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.