मनोरंजनविशेष बातमी

सोंगाचे गाव “राहू” यात्रेसाठी सज्ज

फार वर्षांपुर्वी अगदी प्राचीन काळापासून पुर्वजांपासून सुरु करण्यात आलेली ही परंपरा अखंडीतपणे आजही मोठ्या उत्साहात चालू आहे.

राहू (टीम बातमीपत्र – संदीप नवले) – प्राचीन लोककलेची ऐतिहासिक परंपरा लाभलेले, सोंगाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांना नवसंजीवनी देणारे, लोककला मोठ्या उत्साहात साजरे करणारे “सोंगाचे गाव” म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दौंड तालुक्यातील राहू गावाची ओळख आजही कायम आहे. चैत्र शुद्ध एक प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला दोन दिवस मोठ्या उत्साहात ग्रामदैवत शंभो महादेव यात्रा भरते.

इतिहास / परंपरा – फार वर्षांपुर्वी अगदी प्राचीन काळापासून पुर्वजांपासून सुरु करण्यात आलेली ही परंपरा अखंडीतपणे आजही मोठ्या उत्साहात चालू आहे.

यात्रेची सुरुवात – यात्रेची सुरुवात खऱ्या अर्थाने फाल्गुन महिन्यातील पोर्णीमेपासून म्हणजेच होळी पेटवून केली जाते.होळीच्या दुसऱ्या दिवस म्हणजेच धुलीवंदनापासून रंगपंचमी पर्यंत गावातील बारा बलुतेदार कलाकार मंडळी सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक फारस सादर करतात.रंगपंचमीला रात्री दोन वाजेपर्यंत पारंपारीक सोंगाचा कार्यक्रम पार पडला जातो.

गुढीपाडवा – चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे ग्रामदैवत शंभो महादेवाला अभ्यंग स्नान,विधिवत पुजा,महाभिषेक केला जातो.त्यानंतर भाविकांच्या अभिषेक करण्यासाठी सकाळ पर्यंत रांगा लागलेल्या असतात.

कावडींची सवाद्य मिरवणुक – यात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शंभो महादेवाच्या मानाच्या कावडीसह इतर कावडींची पारंपारीक सवाद्य मिरवणुक काढण्यात येते.सर्व कावडी मुळा-मुठा नदीच्या पाण्याने रांजण भरुन आणल्यानंतर अवघड असा उंच कडा सर करुन नदीच्या पाण्याने शंभो महादेवाला जलाभिषेक घालण्यात येतो.महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील हजारो भाविक कावडींचा हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात.

*पंचागाचे वाचन – जलाभिषेक कार्यक्रम पार पडल्यानंतर लावण्यात आलेल्या आढ्यांची पाहणी करुन संपुर्ण वार्षिक पंचागाचे वाचन करण्यात येते.यामध्ये वर्षभरातील हवामानाचा अंदाज सांगितला जातो.यावरुन वेगवेगळे भाकित वर्तवण्यात येते.

*तुकाई देवीचा छबीना – सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पारंपारीक वाद्यांच्या निनादात तुकाई देवीची पालखी, छबीना मिरवणुक काढण्यात येतो.सोहळ्यामध्ये आकर्षक स्वरुपात शोभेचे दारुकाम,फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते

*ऐतिहासिक सोंगाची परंपरा – तुकाई देवीचा छबीना मिरवणुक गावच्या वेशीवर गेल्यानंतर सायंकाळी आठ वाजता गावातील बारा बलुतेदार कलाकार मंडळींच्या ऐतिहासिक व पारंपारीक सोंगाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येते.यामध्ये गणगौळण, जाडू का बेटा, सारजा, फारस, दैत्य भवानी ( बरोबर मध्यरात्री),पाच पांडव, गणपती, मारुती, काळभैरव, मार्तंड्य, मच्छ, सिद्धी, अर्धनारी, रामलक्ष्मण सीता, बाळंतीण,पोतराज, भिल्ल अशा विविध पारंपारीक वेशभूषा परिधान करुन रात्रभर सोंगाचा कार्यक्रम केला जातो.दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता शेवटी सर्व गाव कारभारी मंडळीचा मुजरा घेऊन सोंगाचा कार्यक्रम समाप्त होतो.

*कुस्ती आखाड्याचे जंगी मैदान – सोंगाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातील सर्व कारभारी मंडळीची गावातून सवाद्य मिरवणुक काढत वाजतगाजत आखाड्यात आणले जाते.त्यानंतर मान्यवरांचे हस्ते आखाड्याचे पूजन करुन वजनी गटातील कुस्त्यांना सुरुवात करतात.चार वाजेपर्यंत आखाड्यात संपुर्ण पंचक्रोशीमधून आलेले नामवंत मल्ल आपले कौशल्य अजमावतात.शेवटी हर हर महादेव गजर करुन यात्रेची सांगता होते.

*प्रमुख वैशिष्ट्ये – दोन दिवस मोठ्या उत्साहात साजर्या होत असलेल्या गावच्या यात्रेत कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना मान देण्याची आदर्श परंपरा गावाने जोपासली आहे. पशूबळी विरहीत यात्रा म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून लोककलेचा इतिहास पाहता सोंगातील अनेक कलाकारांना शासकीय मानधन देखील मिळत आहे.यात्रेनिमित्त शंभो महादेव मंदिर ट्रस्ट यात्रा कमीटीच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच भव्य आकर्षक स्वरुपात स्वागत कमान उभारण्यात येऊन संपुर्ण रस्त्याच्या दुतर्फा, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हजारो भाविक भक्त ग्रामदैवत शंभो महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!