आ.राहुल कुल व आ.जयकुमार गोरे यांच्या मैत्रीच्या चर्चेला राज्यात उधाण
दौंड (टीम बातमीपत्र – रविंद्र खोरकर) – मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले भाव…मित्र व्हायला वेळ लागत नाही पण सच्चा मित्र मिळायला नशीबच लागतं, असं म्हणतात. इथे ना जात-धर्म, गरीब-श्रीमंत हा कोणताच भेद नसतो. त्याला राजकारण तरी कसा अपवाद असेल. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मैत्रीची चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे.
दौंड तालुक्याचे आ. राहुल कुल व मान खटाव चे आ. जयकुमार गोरे हे दोघेही भारतीय जनता पार्टी कडून आमदार आहेत. दोन्ही आमदार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. दोन्ही नेत्यांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे – फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर लगेच केंद्रातील बड्या नेत्याच्या निकटवर्तीय असल्याचे सांगून शंभर कोटीच्या बदल्यात कुल व गोरे यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. मात्र कुल व गोरे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट घालून संबंधिता विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
डिसेंबर महिन्यामध्ये नागपूर येथील अधिवेशन आटपून आमदार राहुल कुल व आमदार जयकुमार गोरे विमानाने पुण्यात दाखल झाले. त्यादिवशी दोघांनी सोबत जेवण केले व आपापल्या मतदारसंघात निघून गेले. मात्र रात्री उशिरा आमदार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात घडला व यामध्ये गोरे गंभीर जखमी झाले. पोलीस खात्यामार्फत या घटनेची माहिती आमदार राहुल कुल यांना मिळाली. मित्राच्या अपघाताच्या बातमीमुळे आमदार राहुल कुल यांनी तातडीने पुण्यातील हॉस्पिटल गाठले. उपचाराची सर्व यंत्रणा सज्ज केली. सकाळपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी पुण्यातील खाजगी हॉस्पिटल बाहेर तोबा गर्दी केली. मात्र आमदार राहुल कुल यांनी माध्यमांशी संवाद साधत आमदार जयकुमार गोरे यांची तब्येत चांगली चांगली असल्याची माहिती दिली. त्यानंतरच आमदार गोरे यांच्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. आमदार गोरे जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते तोपर्यंत प्रत्येक दिवशी आमदार कुल यांनी रात्रीचे जेवण त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्येच केलं.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून आमदार गोरे यांच्या अपघातानंतरचे हे पहिले अधिवेशन आहे. आमदार गोरे यांना चालण्यासाठी त्रास होत असून ते रोज आमदार राहुल कुल यांच्यासोबत वॉकरच्या साह्याने विधिमंडळात प्रवेश करत आहेत. आमदार कुल यांची नुकतीच विधिमंडळ हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार गोरे व आमदार कुल यांनी एकत्रितपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीमधला फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये आमदार कुल हे स्वतः आमदार गोरे यांना व्हीलचेअर वर घेऊन जाताना दिसत आहेत. या फोटोमुळे त्यांच्या मैत्रीची चर्चा राज्यभर सुरू आहे.