“समुद्राच्या पाण्यातून हायड्रोजन निर्मिती” डिझाईन पेटंट भारत सरकारकडून मान्यता देऊन प्रकाशित
दौंड (टीम – बातमीपत्र) भूगोल मित्रांनी तयार केलेल्या “समुद्राच्या पाण्यातून हायड्रोजन निर्मिती” हे डिझाईन पेटंट भारत सरकारकडून मान्यता देऊन प्रकाशित करण्यात आले.
जागतिक स्तरावर वायू प्रदूषणाची वाढलेली पातळी लक्षात घेता हायड्रोजन हा भविष्यासाठी ऊर्जेचा अतिशय चांगला स्त्रोत असू शकतो हाच उद्देश समोर ठेऊन डॉ. राजेश सुरवसे, डॉ. दिलीपकुमार मुळूक, डॉ. अशोक दिवेकर, डॉ. अर्जुन डोके, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. संतोष जाधव, नाशिक, डॉ. सुमंत औताडे, डॉ. महेश लवाटे या भूगोल मित्रांनी समुद्राच्या पाण्यातून स्वच्छ अशा हायड्रोजनचि निर्मिती कशी करता येईल यावर विचार करून संशोधन करण्यास सुरु केले. अनेक तांत्रिक गोष्टींचा समावेश व संशोधन करून त्यांनी समुद्राच्या पाण्यातून स्वच्छ हायड्रोजनची निर्मिती करण्याचे डिझाईन यशस्वीरीत्या तयार केले व “नियंत्रक जनरल पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कार्यालय भारत सरकार नवी दिल्ली याच्याकडे दाखल केले. त्यानंतर भारत सरकार कडून अनेक तांत्रिक कसोट्यांवर परीक्षण करून अखेर २४ मार्च २०२३ रोजी “समुद्राच्या पाण्यातून हायड्रोजन निर्मिती” या डिझाईन पेटंटला मान्यता देण्यात आली व ते प्रकाशित करण्यात आले.
हायड्रोजनच्या ज्वलनाने जीवाश्म इंधनाप्रमाणे कार्बन-डाय-ऑक्साइड तयार होत नाही ज्यामुळे ते ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत बनू शकते. विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून मागणीनुसार हायड्रोजन तयार केले जाऊ शकते आणि म्हणूनच ते साठवून ठेवण्याची गरज लागत नाही सदर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो आणि तो स्वच्छ ऊर्जेचे भविष्यात योगदान देऊ शकतो
भविष्यात अशाच तंत्रज्ञानाचा वापर ऊर्जा निर्मितीच्या पलीकडे असलेल्या उद्देशांसाठी केला जाऊ शकतो त्यामध्ये प्रामुख्याने श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजन देखील तयार करता येऊ शकतो त्यामुळे गोताखोर किंवा पाणबुड्या समुद्रात उपकरणे आणू शकतात आणि हवेसाठी पाण्याच्या पृष्ठभागावर न येता पाण्यामध्येच ऑक्सिजन तयार करू शकतात. समाजातील अनेक स्तरातून सदर संशोधनाचे कौतुक होत असून भविष्याच्या दृष्टीने यासारखे संशोधन अतिशय गरजेचे व उपयुक्त ठरतील.