दौंड रेल्वे स्थानकाची तपासणी वादात, रेल्वे अधिकाऱ्यांचे पाप झाकण्याकरिता कमिटी सदस्यांना बोलावणे टाळले – रोहित पाटील
दौंड(टीम- बातमीपत्र)
दौंड रेल्वे स्टेशन व कॉर्ड लाईन स्टेशन वरील प्रवाशांच्या अडचणींची व त्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यासाठी दिल्ली रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच दौंड रेल्वे स्थानकाला भेट दिली व येथील परिस्थितीची पाहणी केली. परंतु यावेळी सोलापूर व पुणे डिव्हिजन यांनी गठीत केलेल्या डी. आर. यु .सी. सी. कमिटीच्या सदस्यांना स्थानिक रेल्वे प्रशासनाने मुद्दाम होऊन बोलावलेच नसल्याची तक्रार कमिटीचे सदस्य रोहित पाटील यांनी थेट रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. त्यामुळे इन्स्पेक्शन प्रोग्राम वादात सापडला असल्याचे चित्र आहे. दिल्ली बोर्डाचे अधिकारी दौंडला आले असताना त्यांच्या या इन्स्पेक्शन कार्यक्रमावेळी डिव्हिजनने गठीत केलेल्या कमिटीच्या सदस्यांना का? बोलावले गेले नाही याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पत्रकारांनाही ऐनवेळी संपर्क साधल्याने बहुतांशी पत्रकार यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत .त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांचा पाहणी कार्यक्रम चांगलाच वादात सापडला आहे.
दौंड रेल्वे स्टेशन व कॉर्ड लाईन स्टेशन वर प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, आवश्यक सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांना होणारा मनस्ताप, रेल्वे हद्दीत वाढलेली गुन्हेगारी, रेल्वे मालवाहतूक व्यवसाय वाढ हे विषय दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांसमोर मांडणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतचा गंभीर विषय देखील सदरील समितीसमोर आणणे अत्यंत गरजेचे होते. परंतु ज्यांना या कार्यक्रमाला बोलाविणे गरजेचे होते त्यांना न बोलावल्यामुळे सर्व महत्त्वांच्या विषयांवर चर्चाच झाली नाही .हा सर्व प्रकार येथील स्थानिक रेल्वे प्रशासनाने मुद्दामहून केला असल्याचे रोहित पाटील यांचे म्हणणे आहे. येथील रेल्वे अधिकाऱ्यांचे पाप झाकण्याकरिता केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे का? असा प्रश्नही रोहित पाटील यांनी उपस्थित केला आहे.