कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत प्रदुषण करणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाईची आमदार राहुल कुल यांची मागणी, मंत्री दिपक केसरकर यांचे कार्यवाहीचे आदेश ….
दौंड (टिम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रक्रिया उद्योगांद्वारे होत असलेल्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, रासायनिक सांडपाण्यामुळे आजूबाजूच्या शेतीच झालेलं नुकसान , भूगर्भातील पाण्याचे प्रदूषित स्त्रोत याबाबत मागील अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे अधिवेशनात पर्यावरण विभागाचा कार्यभार सांभाळत होते त्यावेळी त्यांनी याबाबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री दिपक केसरकर , आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियामक महामंडळ तसेच एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीमध्ये आमदार कुल यांनी अनेक ठिकाणी रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता चेंबरद्वारे सरळ बाहेर उघड्यावर सोडण्याचे प्रकार अनेक वेळा निदर्शनास येतात विशेषतः पावसाळ्यामध्ये रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्याचे प्रकार सर्रास घडतात याबाबत संबंधित उद्योगांवर कडक कार्यवाही करण्यात यावी.
प्रदूषित रासायनिक सांडपाण्याचा प्रक्रियेसाठी सामूहिक प्रक्रिया केंद्रावर अवलंबून असणाऱ्या उदयोगांचे पाणी वापर व सांडपाणी प्रक्रिया यांचे ऑडिट व्हावे, सामूहिक प्रक्रिया केंद्राद्वारे प्रक्रिया करण्यात येणाऱ्या प्रदूषित रासायनिक सांडपाण्याचे ऑडिट करण्यात यावे .
घातक घनकचऱ्याची वाहतूक, विल्हेवाट नियमानुसार होत नसल्याचे अनेकवेळा निदर्शनास येत आहे, विद्रावक पदार्थ सॉल्व्हन्ट पुनर्प्रक्रिया, तक घनकचऱ्याची वाहतूक, विल्हेवाट नियमानुसार करण्यात यावी.
ग्रामपंचायत हद्दीतील कूपनलिका, विहिरीतील पाणी प्रदुषित झाल्याचे आढळून आले आहे तेथे एमआयडीसी द्वारे मोफत शुध्द पाणी पुरवठा करण्यात यावा यापूर्वी जी पाणीपट्टी बिले आकारली आहे ती रद्द करावी.
प्रदूषित रासायनिक सांडपाण्यामुळे बाधित झालेल्या जमिनींचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात यावे, बाधित शेतकऱ्याना नुकसानभरपाई देण्यात यावी.
आजूबाजूच्या गावांतील कूपनलिका, विहिरीतील पाणी प्रदुषित झाल्याचे आढळून आले आहे, कुरकुंभ एमआयडीसीच्या नजदिकच दौंड शहराला पाणी पुरवठा करणारा पाणी तलाव आहे तो देखील प्रदूषित होऊन हजारो नागरिकांच्या जीवाला धोका संभव असल्याने परिसरातील पाण्याचे प्रवाह, तलाव, कूपनलिका, विहिरीतील पाण्याच्या साठे घेऊन पाण्याची चाचणी करावी.
कुरकुंभ व परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक तपासण्यासाठी यंत्रे बसविण्यात यावी, सर्व उद्योगांद्वारे परिसरातील ग्रीन कव्हर वाढविण्यासाठी वनीकरण सक्तीचे करावे, नियमांचे पालन न करण्याऱ्या उद्योगांवर कडक कार्यवाही करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या
या सर्व मागण्यांची गंभीर दखल मंत्री केसरकर यांनी घेतली असुन याबाबत कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.,
या बैठकीस महाराष्ट्र प्रदुषण नियामक महामंडळाचे संचालक व्ही. एम. मोटघरे, पुणे एमआयडीसी चे विभागीय अधिकारी एस. एल. वाघमारे, पुणे महानगरपालिकेचे जगदीश खोमणे, विनीत देशपांडे, प्रमोद उंडे, पुणे एमआयडीसी चे उपविभागीय अधिकारी प्रताप जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने आदी उपस्थित होते.