दौंड बाजार समितीत परिवर्तन होणार -आ. राहुल कुल
दौंड (टिम – बातमीपत्र)
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भारतीय जनता पार्टीकडून पूर्ण ताकतीने लढविण्यात येत असून बाजार समितीत परिवर्तनाची योग्य वेळ आली आहे.दौंड बाजार समितीत निश्चित परिवर्तन होईल असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी,शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम व मित्र पक्षांच्या जनसेवा विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ चौफुला (ता. दौंड) येथील बोरमलनाथ मंदिरात आज दि.२१रोजी फोडण्यात आला. यावेळी आमदार राहुल कुल बोलत होते.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, ज्येष्ठ नेते नंदू पवार, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात,नामदेव बरावकर,भाजपचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर,सर्जेराव जेधे, धनाजी शेळके,वसंत साळूंखे,
बाळासाहेब तोंडे पाटील,उमेश देवकर, जयदीप सोडनवर आदीसह सर्व उमेदवार व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार कुल म्हणाले की, दौंड बाजार समितीची सन २००६ ची निवडणूक सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने लढवली होती. मात्र त्यावेळी निवडणुकीत म्हणावं तसं यश मिळालं नसलं तरी आपली ताकद त्या निवडणुकीत दाखवली होती. यंदा होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध काम केलं तर सर्व जागा जिंकू असा विश्वास कुल यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे म्हणाले की, बाजार समितीचे निवडणूक ही शेतकऱ्यांच्या हिताची निवडणूक आहे. त्यामुळे भाजप व मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाऊ ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन दिनेश गडधे यांनी केले तर आभार बापु भागवत यांनी मानले.