सोने चांदी लुटणारी टोळी यवत पोलिसांनी पकडली……
यवत(टीम – बातमीपत्र)
सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा टाकून फरारी झालेली टोळी यवत पोलिसांनी पकडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की ,पुणे बंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोने आणि चांदीच्या विटा घेऊन जाणारे पिकअप गाडी अडवून त्यातील मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या चार जणांना यवत पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावर कासूर्डी टोलनाका येथे रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास अटक केली असून त्यांच्याकडून आतापर्यंत 18 किलो चांदी आणि 11 तोळे सोने जप्त करण्यात आले तर आणखी चार किलो सोन्यापेक्षा जादा मुद्देमाल घेऊन दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे त्यांचा शोध यवत पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.
यवत पोलिसांनी दरोडेखोरांनी वापरलेली इंनोवा गाडी देखील ताब्यात घेतली असून सबंधित सोने व चांदी हे कुरिअर ने घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या घटनेमुळे सातारा व पुणे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
यातील अटक करण्यात आलेल्या दरोडेखोर यांनी पाळत राखून हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे यवत पोलिसांच्या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अविनाश शिळीमकर सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे , केशव वाबळे व इतर कर्मचारी यांनी नाकाबंदी करत ही टोळी जेरबंद केली आहे .
याबाबत रविवारी उशिरापर्यंत यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर घटनास्थळी सातारा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यातील फरारी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने श्वान पथकाला देखील पाचारण केले आहे.