स्पर्धा परीक्षेतून नगररचनाचा ‘दिग्विजय’
वरवंड येथील तरुणाची ‘एमपीएससी’तून निवड
दौंड (टीम-बातमीपत्र)
वरवंड ( ता.दौंड) येथील दिग्विजयच्या वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने आधार दिला. मावस काका प्रा.डॉ.अशोक दिवेकर मार्गदर्शन केले. त्याला स्वअध्ययनाची जोड देत राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचे आव्हान त्याने पेलले. त्यात यश मिळवत सहायक नगररचनाकार पदावर नावाप्रमाणेच ‘द्विग्विजय’ मिळवला. तोही पहिल्याच प्रयत्नात. दिग्विजय विश्वास मोरे या तरुणाची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
मुळचे वरंवड (ता. दौंड) येथील असलेले मोरे कुटुंबीय. त्यातील दिग्विजयने पहिल्याच प्रयत्नात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्यातून स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सर्व लक्ष स्पर्धा परीक्षकडे केंद्रीत केले. नगररचना विभागातच करिअर करायचे मनोमन ठरवले. त्यादिशेने अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले. सहायक नगररचनाकार पदावर त्यांची निवड झाली आहे. दिग्विजय यांचे वडील डॉ. विश्वास मोरे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई ज्योती मोरे डॉक्टर आहेत. लहान भाऊ स्थापत्य अभियांत्रिकीमध्येच पदविकेचे शिक्षण घेत आहे. दिग्विजयच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. दौंड तालुक्याचे आमदार अँड. राहुल कुल यांनी दिग्विजय यांचा सत्कार करून त्याला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना दिग्विजय मोरे म्हणाले की, मी २०२१ मध्ये बीई सिव्हिल पदवीधर झालो. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्वअध्ययनावर भर दिला. कोणी जबरदस्ती करून किंवा कोणाच्या सांगण्यावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत नाही. त्यासाठी आपली मनापासून इच्छा असावी लागते. स्वतःची इच्छा असेल तर, आपोआपच यश मिळते आसे त्याने बोलातना सांगितले.