संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा पालखी सोहळा लोणी काळभोर मुक्कामी विसावला
लोणी काळभोर( टीम – बातमीपत्र)
‘संंपदा सोहळा नावडे मनाला,
लागला टकळा पंढरीचा
जावे पंढरीसी आवडी मनासी,
कई एकादशी आषाढी ये
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी,
त्याची चक्रपाणी वाट पाहे’
अशा भजनांच्या ओळी गात खांद्यावर भगव्या पताका, कपाळी केशरी गंध, गळ्यात तुुळशीची माळ व मुखाने ज्ञानोबा – तुकाराम असा जयघोष करत, सोबतीला आसमंतांत घुमणारा टाळ – मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामांत दंग झालेले वारकरी भक्ती भावाने ओथंबलेल्या अभंगाच्या ओळी गात, विठ्ठल भेटीच्या ओढीने आतुरलेली लाखो टाळकरी, फडकरी, वारकरी यांची मांदियाळी पुण्यातील नागरिकांचा दोन दिवसांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन टाळ मृदूंगाच्या निनादांत व टाळ – मृदुंगाचा गजर करत चिपळ्यांच्या तालावर मंत्रमुग्ध झालेल्या वारक-यांसह जगतगुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर मध्ये आला.
यावेळी पंचक्रोशीत जणूू भक्तीचा मेळा लागल्याचा प्रत्यय आला. संपुुुर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देही याची डोळा साठवला. सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांसमवेत विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी अपुर्व उत्साहात फुलांची उधळण करत केेले. यावेळी लोणी काळभोर परिसराला भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झालेे होते.
पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिरात आज सकाळी पूजा झाल्यानंतर सकाळी पालखी रथात ठेवण्यात आली. पालखी सोहळा पुलगेट मार्गे हडपसर येथे आला. गाडीतळ येथे विसावा घेवून सोहळ्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोरकडे मार्गक्रमण केले. शेवाळेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताचा स्विकार करून सोहळा मांजरी फार्म येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबला.
पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामात मिळालेल्या विश्रांतीमुळे ताजेतवाने झालेले वारकरी, टाळकरी आणि फडकरी झपझप पावले टाकत होते. डोळे पंढरीकडे, मुखी विठूरायाच्या अखंड नामस्मरणाचा गजर करत, भक्तीरसात चिंब होऊन महामार्गावरील एक – एक टप्पा मागे टाकत पालखी सोहळा रथापुढे २६ व मागे ३०३ अशा एकूण ३२९ दिंड्यातील लाखो वारक-यां समवेत कवडी पाट टोलनाका येथे आला.
लोणी स्टेशन येथे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सचिन काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष नंदू काळभोर व त्यांच्या सहका-यांनी स्वागत केले. याठिकाणी विश्वराज हॉस्पिटल व वैष्णवी नर्सिंग होमच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारांस पालखी सोहळ्याने पुणे – सोलापूर महामार्ग सोडून लोणी काळभोरमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सर्व वारकरी टाळ मृदूंगाच्या ठेक्यावर बेधुंद होवून नाचत होते. याच्या झंकाराने संंपुर्ण आसमंत निनादून गेला होता. काही जण फुगड्या खेळत होते तर काहीनी मानवी मनोरे उभारून भागवत धर्माची पताका आसमंतात फिरवून आपला आनंद व्यक्त करत होते. त्याच अपुर्व उत्साहांत लोणी काळभोर ग्रामस्थांनी त्यांचे फुलांच्या वर्षावांत स्वागत केले. यावेळी दुुुतर्फा नागरिक दर्शनासाठी ऊभे होते. ते रथाच्या पुढे डौलाने चालणा-या मानाच्या अश्वाचे दर्शन भक्तिभावाने घेत रथात ठेवलेली तुकाराम महाराज पालखी व पादुुुका दिसल्या तरी कृृृतकृत्य होत होते. दत्त मंदिरानजीक माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, सरपंच योगेश काळभोर, माजी सरपंच भोलेनाथ शेलार, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाो काळभोर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले. कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण काळभोर, हभप विनोद महाराज काळभोर यांनी विठ्ठल मंदिराजवळ स्वागत केले.
कन्या प्रशालेच्या विद्यार्थीनींनी गावातील रस्त्यावर रांगोळी काढत पालखीचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कलामंचच्या कलाकारांनी ग्रामस्वच्छता अभियान पर्यावरणांबाबत जनजागृती केली.
पालखी गावातील श्री विठ्ठल मंदिरांत मुक्कामी पोहोचल्यानंतर श्रीमंत अंबरनाथ देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष योगेश काळभोर यांनी स्वागत केले. त्यानंतर आरती झाली. रात्री जागर व किर्तन झाले. सर्व वारक-यांना गावातील अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठाण, संत निरंकारी मंडळ, शितलाशक्ती मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, शिवशक्ती मंडळ, जय बजरंग तरूण मंडळ, संत रोहिदास चॅरीटेबल ट्रस्ट, जय महाराष्ट्र तरूण संघटना, जय जवान ग्रामविकास प्रतिष्ठान, राजा शिवछत्रपती तरूण मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, त्रिमुर्ती मित्र मंडळ, समता समाजसेवा तरूण मंडळ, क्रांतीवीर मित्र मंडळ, श्रीमंत अंबरनाथ तरुण मंडळ, महात्मा गांधी मित्र मंडळ तसेच मुस्लिम व शिख समाज बांधव व इतर सेवाभावी संस्थांनी फराळाचे नियोजन केले होते. श्रीमंत अंबरनाथ देवस्थान समितीच्या वतीनेही वारक-यांसाठी फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले होते. रात्रभर चाललेल्या भजन, किर्तन, जागर, प्रवचन व हरीनामाच्या जागरामुळे संपुर्ण लोणी काळभोर परीसर विठ्ठलमय झाला आहे.
यावेळी नागरिकांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष केला. यावेळी पालख्यांसह कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील नागरिक टोलनाका परिसरापासून लोणी काळभोर गावात चालत देखील गेले. तसेच अनेकांनी ‘सेल्फी’ टिपत ही आठवण छायाचित्रात बंदिस्त केली.