ग्यानबा तुकारामांच्या गजरात तुकोबांची पालखी यवत मुक्कामी…
यवत (टीम – बातमीपत्र)
जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी दि.१५ रोजी रात्री आठ वाजता यवत मुक्कामी दाखल झाला असून यावेळी यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले .
यवत मधील काळभैरवनाथ मंदिरात पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर दिंडी प्रमुखांची हजेरी आणि समाज आरती होऊन तुकोबारायांच्या पादुका दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती .
गुरुवारी दिवसभर उन्हाची तीव्रता जास्त असल्याने वैष्णव जणांनी सायंकाळीच पालखी मार्गावरून जाणे पसंत केल्याने दुपारपर्यत ओस पडलेला पालखी मार्ग सायंकाळी वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.
तुकोबारायांचा पालखी सोहळा यवत मुक्कामी येणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व पूर्वतयारी करून ठेवली होती. यामध्ये वारकरी भक्तांना अंघोळ करण्यासाठी एक हजार नळ कनेक्शन बाजार मैदान परिसरात तयार करण्यात आले असून तीन सार्वजनिक विहिरीचे पाणी पिण्यासाठी शुद्धीकरण करण्यात आले आहे. तसेच निर्मलवारीच्या माध्यमातून जवळपास एक हजार शौचालय उभारण्यात आली असल्याची माहिती सरपंच समीर दोरगे यांनी दिली आहे.
तर जिल्हा प्रशासनाने पालखी मुक्कामचे ठिकाण असणाऱ्या मंदिरा लगत नियंत्रण कक्ष उभा केला होता त्या ठिकाणी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना तैनात केले होते जेणे करून कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली होती.
दरम्यान लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा उरुळी कांचन येथे विसाव्यासाठी थांबला होता त्यांनतर पालखी महामार्गावरील दौंड तालुक्यातील पहिले गाव बोरिभडकच्या वतीने हवेली आणि दौंडच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात दौंडचे नागरिक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतसाठी उपस्थित होते. बोरिभडक ग्रामपंचायतच्या वतीने भव्य मंडप पालखी मार्गावर उभारण्यात आला होता तसेच पालखी दौंडच्या हद्दीत दाखल होताच पुष्पवृष्टी करण्यात आली पालखी सोहळा खामगाव , कासुर्डी, सहजपुर असे मजल दरमजल करत यवत मुक्कामी दाखल झाला .
दौंड आणि हवेली तालुक्याच्या सीमेवर पालखी सोहळ्याचे स्वागतासाठी दौंडचे आमदार राहुल कुल, खासदार सुप्रिया सुळे ,जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल , राष्ट्रवादी काँगेसच्या महिला पुणे विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, बोरिभडकचे सरपंच कविता कोळपे ,उपसरपंच प्रवीण खेडेकर , आप्पासाहेब पवार ,माऊली ताकवणे , बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे , उपसभापती शरद कोळपे,धनाजी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते .
तर प्रशासन च्या वतीने प्रांताधिकारी मिनाज मुल्ला तहसीलदार अरुण शेलार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे स्वप्नील जाधव पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे भाऊसाहेब पाटील अविनाश शिळीमकर उल्हास कदम गटविकास अधिकारी अजिंक्य येळे उपस्थित होत.