“बा विठ्ठला” बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
पंढरपूर (टीम बातमीपत्र) बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे.
या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाला ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाले.
राज्य शासनाने या एक वर्षाच्या काळात जनकल्याणाचे अनेक निर्णय घेऊन सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून १०८ कोटी आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी ७३ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, ३० खाटांचे रूपांतर १०० खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.