मुंबई (टीम बातमीपत्र) राज्यात ९ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह ७०० ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी २१० कोटींचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत सध्या १५५ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू आहेत. या दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत ७ लाख ४३ हजार ५७० रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. त्याची राज्यभर व्याप्ती वाढविण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्यात ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पुढील चार वर्षांसाठी लागणाऱ्या निधीची देखील तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या धर्तीवरच संपूर्ण राज्यात हे दवाखाने सुरू करण्यात येतील.
नऊ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये
राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल. यासाठी ४ हजार ३६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या दवाखान्यांसाठी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी, औषधे, चाचण्या, संगणकीय सामुग्री, ५०० चौरस फूट जागा आणि फर्निचर तसेच वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अटेंडंट देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या दवाखान्यांमधून ३० प्रकारच्या चाचण्या करण्यात येतील. दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी असेल.