दौंडनगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली…
दौंड (टीम- बातमीपत्र)
तुज पाहतां सामोरी । दृष्टी न फिरे
माघारी ॥१॥
माझे चित्त तुझ्या पायां मिठी पडली
पंढरिराया ॥२ ॥
नोहे सारितां निराळें । लवण
मेळवितां जळें ॥ ३ ॥
तुका म्हणे बळी । जीव दिला
पायांतळी ॥४ ॥
जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंगांच्या वर्णनाप्रमाणे दौंड शहरात भक्तीचा परमानंद पहावयास मिळाला.भक्तिमय वातावरणात दौंडला आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या दौंडच्या प्राचीन विठ्ठल राही रुक्मिणीच्या मंदिरात भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती.शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे कुरकुंभ, गिरिम ,गोपाळवाडी,मळद ,
पांढरेवाडी ,लिंगाळी, मसनेरवाडी, मेरगळवाडी, माळवाडी, जिरेगाव, शिर्सुफळ ता. बारामती, वासुंदे ,येडेवडी, मांढरेमळा आदी गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत पांडुरंगाच्या मंदिरात क्षेम आलिंगन देण्यास आल्या होत्या. शहरात ठीक ठिकाणी पालख्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथापरंपरेप्रमाणे दौंड गावचे पाटील वीरधवल जगदाळे, इंद्रजित जगदाळे यांनी शहरात पालख्यांचे स्वागत केले. दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनीहि पालख्यांचे स्वागत केले.नगरपालिका प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी संतोष टेंगले यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही पालख्यांचे स्वागत केले.
या पालख्या वाजतगाजत भीमा नदी तीरी गेल्या तिथे ग्रामदेवतांच्या मुखवट्यांना स्नान घालण्यात आले. भीमातीरी ग्रामदेवतांच्या आरत्या झाल्या आरत्या झाल्यानंतर मानाप्रमाणे पालख्या विठ्ठल मंदिरात गेल्या तिथे प्रदक्षिणा झाल्यानंतर पालख्या आपल्या गावी रवाना झाल्या. पालख्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पालख्यांचे स्वागत करण्यासाठी शहरातील अनेक मंडळे, पक्ष संघटना यांनी अन्नदान केले.
प्रति पंढरपूर असणाऱ्या शहरातील विठ्ठल राही रुक्मिणीच्या मंदिरात पहाटे चार वाजता अभिषेकास सुरवात करण्यात आली. यावेळी विधिवत पूजा करण्यात आली. या पूजेस दौंडचे सुपुत्र व पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे सपत्नीक बसले होते. याचे पौराहित्या अतुल गटणे यांनी केले. मंदीरात दर्शनासाठी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखिल मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.