पाटसच्या नागेश्वर विद्यालयातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात ……
पाटस (टीम – बातमीपत्र)
पाटस( ता.दौंड) येथील नागेश्वर विद्यालयात ३० वर्षांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा वर्ग भरला आहे. या विद्यालयातून १९९३ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विद्यालयात एकत्र येऊन या विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी १९९३ सालच्या गुरुजनांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यासाठी पुणे,मुंबई,बारामती विशेष म्हणजे अमेरिका अशा विविध ठिकाणांवरून माजी विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांनी आपण केलेले व्यावसायिक व सामाजिक कार्य सगळ्यांसमोर मांडले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालय काळातील गमती जमती,गप्पा शिक्षकांच्या आठवणी जागवत हा
स्नेहमेळावा नुकताच पार पडला. यामुळे तत्कालीन शिक्षक भारावून गेले. हीच आमच्या शैक्षणिक क्षेत्रात कामाची पावती असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
सरस्वती व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने,शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच यावेळी अकाली निधन पावलेल्या शिक्षक व माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी गुरुजनांचा शाल श्रीफळ तसेच आरोग्यदायी तुळशीचे रोप देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचाही झाडांची रोपे देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.पुन्हा शाळेत सर्वच विद्यार्थी, शिक्षक बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे या भेटीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत शिक्षण घेतलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या “मैत्रीच्या कट्ट्यावर” तब्बल ३० वर्षांनी पुनश्च भेटीचा योग जुळून आला. या बॅचमधून उच्च शिक्षण घेत प्रगतशील शेतकरी,इंजिनिअर,पत्रकार,
राजकारणी, व्यापारी, कॉन्ट्रॅक्टर, तसेच देशसेवा करणारे आजी-माजी सैनिक, उत्तम गृहिणी,
शिक्षिका, उद्योजक आदी माजी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
दरम्यान या माध्यमातून शाळेसाठी ‘१००’ बेंचेसची (₹.४.५ लक्ष)उपलब्धता करून देण्याचे ठरले यासाठी अमेरिका स्थित सचिन देशपांडे यांनी बेंचेससाठी २ लाख रुपयांचे योगदान दिले.
यावेळी तत्कालीन शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी अविनाश मोहिते, विजय सोनवणे, हर्षद बंदीष्टी,सुनील रंधवे,छाया ढमाले,मनीषा निंबाळकर,शांता निंबाळकर यांनी आपले विचार मांडले.
नागेश्वर विद्यालयातील उत्तम रुपणवर यांनी शाळेच्या सद्यस्थिती बाबत माहिती दिली.
सूत्रसंचालन आदिनाथ बनकर ,प्रास्ताविक सचिन देशपांडे आणि आभारप्रदर्शन संदीप मेमाणे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमंत भागवत, हेमा भिले,डॉ सुहास भागवत,आनंद कासवा,संदीप मेमाणे, हर्षद बंदीष्टी,आदिनाथ बनकर ,बिभीषण शिंदे यांनी योगदान दिले.