दौंडमध्ये पैसा झाला प्यारा, मालमत्तेत हक्क मिळणार नाही म्हणून मित्रांच्या सहाय्याने खून, पण घरात पाय घसरून पडून मृत्यू झाल्याचा केला होता बनाव……
यवत (टीम – बातमीपत्र)
पैसा झाला मोठा माणूस झाला छोटा, याचा प्रत्यय दौंड तालुक्यातील वरवंड गावात आला आहे. तालुक्यातील वरवंड येथे वहिनीला तिचे वडीलांच्या मरणानंतर मालमत्ता देणार नाहीत, त्याचा राग मनात धरून दिराने मित्रांच्या साह्याने वहिनींच्या वडिलांची वन विभागाच्या हद्दीत गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली असल्याची माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.
अतुल जगताप, प्रणव भंडारी, विजय मंडले, राकेश भंडारी (सर्व रा. वरंवड ता. दौड) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना २७ मार्च २०२२ रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राकेश भंडारी याने आपली वहिनी सपना राहुल भंडारी यांना त्यांचे वडील सुरेश नेमीचंद गांधी हे त्यांचे मरणा नंतर मालमत्तेमध्ये हक्क देणार नाहीत. याचा राग मनात धरून वरंवड हद्दीतील वन विभागाच्या जमीनीमध्ये सुरेश नेमीचंद गांधी यांचा गळा दाबुन खुन केला व पुरावा नष्ट करण्यासाठी ते घरामध्ये पाय घसरून पडुन मयत झाले असा बनाव करुन तशी माहिती सर्व नातेवाईकांना सांगून त्यांचा अंत्यविधी केला.
मात्र एक वर्षानंतर वरवंड येथील कालीदास शिवदास शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर पोलीसही चक्रावून गेले. घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चार जणांवर खुन करणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहे.