दौंडमधील गुन्हेगारीला आळा बसणार, पाटसला नवीन पोलीस स्टेशन तर दौंडला पोलीस चौकीला मंजूरी – आ. राहुल कुल यांच्या मागणीला यश…
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्याचे विभाजन करून पाटसला नवे पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात येईल. तसेच दौंड शहरात आणखी एक पोलिस चौकशी सुरू करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.२७ जुलै विधानसभेत केली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
याबाबत माहिती देताना आमदार राहुल कुल म्हणाले की , दौंड तालुक्यात दौंड व यवत पोलिस ठाणे, उपविभागीय अधिकारी, एसआरपी गट क्रमांक पाच आणि सात व पोलिस प्रशिक्षण केंद्र या आस्थापना आहेत. त्यामधील पोलिस स्टेशन, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच, दौंड शहरात एक पोलिस चौकी व्हावी
अशी मागणी केली हेाती.
याशिवाय दौंड तालुका ७० टक्के ‘पीएमआरडीए’मध्ये गेलेला आहे. तालुक्यात रेल्वे जंक्शन व रेल्वेलाईन, तीन महामार्ग आणि एक एमआयडीसी असूनही तालुक्यात केवळ दोनच पोलिस स्टेशन आहेत. त्यामुळे पाटसला नवीन पोलिस ठाणे सुरू करावे. त्याचा प्रस्तावही तयार केला हेाता. त्याची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी कुल यांनी विधानसभेत केली.
त्यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की , राहुल कुल यांनी पाटस पोलिस ठाण्याच्या संदर्भात केलेली मागणी मी मंजूर करत आहे, अशी घोषणा केली. पोलिसांचा आकृतीबंध नसल्यामुळे ही मागणी एवढे दिवस मान्य होत नव्हती. पण आपण आता पोलिसांच्या नवीन आकृतीबंधाला मान्यता दिलेली आहे, त्यामुळे नव्या पोलिस ठाण्यासंदर्भातील प्रश्न मिटला आहे.
दौंड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत एक पोलिस चौकी निर्माण करण्यासाठीही आपल्याला जागा उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे दौंड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत एक पोलिस चौकीही मंजूर करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पोलिस इमारती आपल्याला सर्वांना एकाच वेळी देता येणार नाहीत. त्याची प्राधान्य यादी ठरविण्यात आली आहे. आमदार राहुल कुल आणि तेथील विभाग प्रमुखांशी चर्चा करून यादीतील कुठल्या इमारतीला प्राधान्य द्यायचे, याचा निर्णय घेण्यात येईल. टप्प्याटप्याने आपण इतर सर्वच इमारतींचे काम करणार आहोत असेही गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.